ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार तरुणाचा अपघाती मृत्यू; ४ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 17:14 IST2021-12-31T17:14:32+5:302021-12-31T17:14:40+5:30
तरुणाच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीस्वार तरुणाचा अपघाती मृत्यू; ४ महिन्यापूर्वीच झाले होते लग्न
मंचर : ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात पुणे - नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत 42 मैल येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता झाला. दीपक ऊर्फ सचिन शिवाजी भालेराव (वय 29 रा. कळंब) असे अपघातात गमावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक उर्फ सचिन शिवाजी भालेराव हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन नारायणगाव बाजूकडून कळंबला चालला होता. पुणे- नाशिक महामार्गावर रहदारीच्या नियमांकडे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात वाहन चालवून जात ओव्हरटेक करून जात असताना कळंब बाजूकडून जाणारा ट्रक चालकाच्या बाजूने धडकला. या अपघातात दीपक गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला आहे. याप्रकरणी संदेश शिवाजी भालेराव यांनी फिर्याद दिली असून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल दिपक उर्फ सचिन शिवाजी भालेराव याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दीपकचे लग्न चार महिन्यापूर्वी झाले होते. त्याच्या मागे पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील करत आहेत.