स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू;लोणी काळभोरमधील दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 12:51 IST2025-05-11T12:51:34+5:302025-05-11T12:51:50+5:30

- अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी उपनिरीक्षक जखमी

Accidental death of a student preparing for a competitive exam | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू;लोणी काळभोरमधील दुर्घटना

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू;लोणी काळभोरमधील दुर्घटना

पुणे : उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राच्या विवाह समारंभातून घरी निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा दुभाजकावर आदळून मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी पोलिस उपनिरीक्षक तरुण जखमी झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण पुण्यातील ’स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.

समाधान संभाजी भिटे (३१, रा. नीर निंबगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी उपनिरीक्षक मयूर सुनील डोंगरे (२९) हे जखमी झाले आहेत. डोंगरे मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक आहेत. समाधान भिटे आणि त्यांचा भाऊ सध्या मंगळवार पेठेत राहायला होते. ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, अशी माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान आणि मयूर यांचा मित्र उपजिल्हाधिकारी आहे. त्याचा विवाह शनिवारी (दि. १०) लोणी काळभोर भागातील सोरतापवाडीतील एका मंगल कार्यालयात पार पडला. शुक्रवारी (९ मे) रात्री हळदीचा कार्यक्रम होता. समाधान आणि मयूर हे शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरुन घरी निघाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट परिसरात भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात समाधान आणि सहप्रवासी मयूर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना समाधान यांचा मृत्यू झाला. समाधान यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘स्व-रूपवर्धिनी’ संस्थेत शाेककळा पसरली. त्यांच्याबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सहकारी मित्रांना धक्का बसला.

समाधान यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. शोकाकुल वातावरणात इंदापूर तालुक्यातील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांच्यामागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Accidental death of a student preparing for a competitive exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.