Accident : जुन्नर येथील शिंदळदरा रस्त्यावर पिकअप दरीत पलटी; १ ठार, १२ महिला तर ६ मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:01 IST2025-09-30T19:00:54+5:302025-09-30T19:01:16+5:30
- अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले

Accident : जुन्नर येथील शिंदळदरा रस्त्यावर पिकअप दरीत पलटी; १ ठार, १२ महिला तर ६ मुले जखमी
ओतूर : ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत आज (दि. ३०) दुपारी साधारण ३ वाजण्याच्या सुमारास मढ–तळेराण रस्त्यावर शिंदळदरा येथे एक भीषण अपघात घडला. पिकअप गाडी (क्रमांक MH 12 JL 5838) नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गवतावरून घसरून सुमारे ८ ते १० फूट खोल दरीत पलटी झाली.
या अपघातात गाडीत प्रवास करणाऱ्या १२ ते १४ महिला गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव कविता विठ्ठल गवारी (वय ३५, रा. गवारवाडी सांगणारे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आहे. याशिवाय ४ ते ६ लहान मुलेही जखमी झाली आहेत.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले आणि तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले. अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
हा अपघात नेमका कसा घडला ? वाहनचालकाची चूक होती का ? याचा तपास पोलीस करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला व लहान मुले एकत्रित प्रवास करत असताना घडलेला हा अपघात अतिशय धक्कादायक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.