रस्ता ओलांडताना वेगवान वाहनाची धडक;सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:20 IST2026-02-10T19:19:55+5:302026-02-10T19:20:08+5:30
कुटुंबाचा आधार आणि देशाचा एक रक्षक गमावल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

रस्ता ओलांडताना वेगवान वाहनाची धडक;सुट्टीवर आलेल्या सीआरपीएफ जवानाचा अपघाती मृत्यू
कळस : मराडेवाडी रुई (ता. इंदापूर) येथील सुपुत्र आणि केंद्रीय राखीव पोलिस दलातील कर्तव्यदक्ष जवान महादेव दादा नाझीरकर (वय ३४) यांचा पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी-देवकर येथे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबाचा आधार आणि देशाचा एक रक्षक गमावल्याने ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे.
महादेव नाझीरकर हे केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत असल्याने ते मुंबईत वास्तव्यास होते. नुकतेच ते सुटीवर आपल्या गावी मराडेवाडी येथे रविवारी रात्री ११ वाजता आले होते. त्यांचे वडील त्यांना घेण्यासाठी आलेले असता, यावेळी रस्ता ओलांडून जात असताना वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत.
मुलगा सुटीवर आल्याने वडील दादा लक्ष्मण नाझीरकर रात्री त्यांना घेण्यासाठी आले होते. मात्र, ज्या पित्याने बोट धरून चालायला शिकवले, त्याच वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या काळजाचा तुकडा काळाच्या पडद्याआड गेला. अपघात झाला तेव्हा महादेवचे वडील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते. आपल्या लेकाचं येणं ते डोळे भरून पाहत होते, पण पुढच्याच क्षणी एका अज्ञात काळरूपी वाहनाने लेकाला चिरडले. मुलाचा देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.