महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 17:23 IST2025-07-21T17:21:53+5:302025-07-21T17:23:03+5:30

लोकसभा, विधानसभेला मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही

aam admi party big decision in Maharashtra left India Aghadi will contest the Municipal Corporation elections independently | महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार

महाराष्ट्रात 'आप' चा मोठा निर्णय; इंडिया आघाडीला ठोकला रामराम, मनपा निवडणूक स्वतंत्र लढणार

पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया आघाडी’बरोबर राहिलेल्या आम आदमी पार्टी (आप) पक्षाने दिल्लीबरोबरचमहाराष्ट्रातही काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला ‘आप’ने रामराम ठोकला असून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी अजित फाटके यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. पुणे जिल्हा परिषद निवडणूक तसेच पंचायत समिती, गण व गट ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय पक्षाने आधीच जाहीर केला आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, नगर पंचायती व पुण्यासह अन्य जिल्हा परिषदांमध्येही पक्ष स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे करणार आहे. त्याप्रमाणे तयारी करण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला तसेच राज्यातील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकसभेची निवडणूक ‘आप’ने ‘इंडिया आघाडी’त सहभागी होऊन लढवली, मात्र लोकसभेसाठी राज्यात कुठेही उमेदवार दिला नव्हता. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काही मतदारसंघांची पक्षाकडे मागणी करून तिथून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. इंडिया आघाडीबरोबर तशी बोलणी करावीत, असेही पक्षाला कळवले होते. मात्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही इंडिया आघाडीला पाठिंबा जाहीर करून पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील एकही जागा लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे इच्छुक कार्यकर्ते नाराज झाले होते. तेव्हापासूनच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वतंत्रपणे लढाव्यात, अशी मागणी होत होती. दरम्यानच्या काळात ‘आप’ व ‘काँग्रेस’ यांच्यातील राजकीय वातावरण बरेच बिघडले. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने आपच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळेच ‘आप’च्या काही उमेदवारांचा पराभव झाला. सलग दोन वेळा दिल्लीतील मतदारांनी ‘आप’कडे दिल्लीची सत्ता दिली होती. यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत मात मिळाली. त्यामुळे काँग्रेसबरोबरचे राजकीय संबंध बिघडून त्याचा परिणाम ‘आप’ने ‘इंडिया आघाडी’ सोडण्यात झाला आहे. अजित फाटके यांनी सांगितले की, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सक्रिय मदत करूनही आम्ही त्यांच्याकडे एकही जागा मागितली नाही, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.’’

मागील काही वर्षे ‘आप’चे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी राज्याच्या विविध भागांमध्ये समर्पण वृत्तीने काम करत आहेत. त्याशिवाय कामगार क्षेत्रातही आपने काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चांगले संघटनात्मक काम केले आहे. विशेषत: महापालिका क्षेत्रामध्ये चांगले संघटन उभे राहिले आहे. त्याचा स्वतंत्रपणे लढण्याला निश्चितपणे उपयोग होणार आहे.- अजित फाटके, राज्य प्रभारी, आप

Web Title: aam admi party big decision in Maharashtra left India Aghadi will contest the Municipal Corporation elections independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.