आधार कार्ड आणि शर्टाचं बटण ठरला महत्वाचा पुरावा ;  खुनातील आरोपीला मिळाली जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 21:18 IST2021-08-10T21:17:13+5:302021-08-10T21:18:07+5:30

तीन साक्षीदार फितूर झाले..पण घटनेच्या ठिकाणी सापडलेले आरोपीचे आधार कार्ड,तसेच शर्टाचे बटण महत्वाचे पुरावे ठरले.

The Aadhaar card and shirt button became important proof; life Imprisonment to accused in the murder case | आधार कार्ड आणि शर्टाचं बटण ठरला महत्वाचा पुरावा ;  खुनातील आरोपीला मिळाली जन्मठेप

आधार कार्ड आणि शर्टाचं बटण ठरला महत्वाचा पुरावा ;  खुनातील आरोपीला मिळाली जन्मठेप

पुणे : तीन साक्षीदार फितूर झाले..पण घटनेच्या ठिकाणी आरोपीचे आधार कार्ड,तसेच शर्टाचे बटण सापडले. पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेल्या शर्टाचेच ते बटण असल्याचे न्यायालयात सिध्द झाले. तसेच, कपड्यावर असलेले रक्ताचे डाग आणि त्याने दाखवलेली घटनास्थळाची जागा हे परिस्थितीजन्य पुरावे, सहाय्यक जिल्हा सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.सत्र न्यायाधीश ए.एन.सिरसिकर यांनी हा आदेश दिला.

दुर्गेशनाथ गोपीनाथ गोस्वामी (वय 29, रा. लोहगाव, मूळ. राजस्थान) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. नरसिंगराम बुटाराम गर्ग असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी सात साक्षीदार तपासले. 

ही घटना 28 ते 29 ऑक्टोबर 2018 रोजी घडली. मयत गर्ग आणि गोस्वामी दोघेही मूळचे राजस्थानचे. दोघेही चांगले मित्र.  गोस्वामी याचे फर्निचरचे काम गर्ग याने केले होते. त्याचे दोन हजार रुपये तो वारंवर मागत होता. 28 ऑक्टोबर रोजी गर्गने पैशाची मागणी केली. त्यावेळी बुधवार पेठ येथे जाऊन गोस्वामी याने त्याला 1 हजार रुपये दिले. त्यानंतर दारू पिल्यानंतर 29 ऑक्टोबर रोजी पहाटे ते दुचाकीवरून लोहगावकडे चालले होते. त्यावेळी संगमवाडीकरून सादलबाबा चौकाकडे जाणा-या रस्त्यावर ते लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दोघात पुन्हा शाब्दिक भांडण सुरू झाले. त्यावेळी गोस्वामी याने गर्ग यास शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर लाथ मारल्यानंतर बाजूला असलेल्या ओढ्यात गर्ग पडला. वरून सिमेंटचा ब्लॉक मारून गोस्वामीने मित्राचाच खून केला. खिशातील एक हजार रुपये घेऊन तो निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-----------------------------------------------

Web Title: The Aadhaar card and shirt button became important proof; life Imprisonment to accused in the murder case