बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून बारामतीत तरुणाला संपवलं, मारेकऱ्यांना १२ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 13:59 IST2024-12-21T13:57:49+5:302024-12-21T13:59:43+5:30

दारूच्या नशेत कट रचून तिघांनी केला अनिकेतचा निर्घृण खून 

A young man was killed in Baramati in anger for chatting with his sister, the killers were arrested within 12 hours. | बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून बारामतीत तरुणाला संपवलं, मारेकऱ्यांना १२ तासांत अटक

बहिणीशी चॅटिंग केल्याच्या रागातून बारामतीत तरुणाला संपवलं, मारेकऱ्यांना १२ तासांत अटक

बारामती : सोशल मीडियावरील एका अल्पवयीन मुलीशी चॅटिंग करण्यावरून झालेल्या वादाने एका तरुणाचा जीव घेतला. बारामती शहरातील अनिकेत सदाशिव गजाकस (वय २३, रा. देसाई इस्टेट, बारामती) याचा तिघांनी मिळून दारूच्या नशेत कोयत्याने सपासप वार करून खून केला. गुरुवारी, १९ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता ही खळबळजनक घटना घडली.

अनिकेतचा खून झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र बारामती पोलिसांनी १२ तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. या प्रकरणाने संपूर्ण बारामती हादरून गेली आहे.

वादातून खुनाचा थरार

अनिकेत आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर चॅटिंगवरून वाद झाला होता. हा वाद इतका चिघळला की आरोपींनी त्याचा खून करण्याचा कट रचला. अनिकेत प्रगतीनगर क्रिएटिव्ह अॅकॅडमीकडून टीसी कॉलेजकडे जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. नंदकिशोर अंभोरे (वय १९, रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी), महेश खंडाळे (वय २१, रा. यदुपाटीलनगर, तांदुळवाडी), आणि संग्राम खंडाळे (वय २१, रा. शेळकेवस्ती, तांदुळवाडी) या तिघांनी स्प्लेंडर दुचाकीवर येत अनिकेतवर कोयत्याने हल्ला केला. नंदकिशोर अंभोरे याच्या आतेबहिणीसोबत बोलण्यावरून वाद झाला होता. वादाच्या परिणामी तिघांनी मिळून अनिकेतचा निर्घृण खून केला.

पोलिसांची कारवाई

अनिकेतच्या भावाने, अभिषेक गजाकस यांनी, शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. आरोपींचे मोबाईल नंबर मिळवून त्यांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा (सीडीआर) मागोवा घेतला. तपासादरम्यान आरोपी सोलापूर जिल्ह्यातील अकलुज खंडाळी येथे असल्याची माहिती मिळाली.

बारामती पोलिसांनी शिताफीने आरोपींना शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली.

या प्रकरणाची कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलिस निरीक्षक विलास नाळे, सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक सतीश राऊत, हवालदार अभिजित एकशिंगे, रामचंद्र शिंदे, आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी बजावली.

बारामतीत खळबळ

दरम्यान, अनिकेतच्या खुनाने बारामतीत एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी बारामतीतील टीसी कॉलेज येथे असाच खुनाचा गुन्हा घडला होता. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: A young man was killed in Baramati in anger for chatting with his sister, the killers were arrested within 12 hours.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.