Pune | कात्रज भागात तरुणाचा निर्घृण खून; गजाने केली होती बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:02 IST2022-12-21T12:36:32+5:302022-12-21T13:02:50+5:30
उपचार सुरू असताना तरूणाचा १९ डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात मृत्यू...

Pune | कात्रज भागात तरुणाचा निर्घृण खून; गजाने केली होती बेदम मारहाण
पुणे : कात्रज भागात तरुणाला गजाने बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रकाश निवृत्ती रेणुसे (वय २७, सच्चाईमाता मंदिराजवळ, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्याचे नाव असून, कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबत पोलीस कर्मचारी अनिल भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कात्रज भागातील दुगड शाळेजवळ रेणुसे हा १३ डिसेबर रोजी जखमी अवस्थेत पडला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेणुसेला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा १९ डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.
रेणुसे याचा मृत्यू बेदम मारहाणीत झाला आहे. त्याच्या डोक्यावर गजाने मारहाण केल्याचे आढळून आले. शवविच्छेदन अहवालात रेणुसेचा खून झाल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून खुनामागचे कारण समजू शकले नाही. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करत आहेत.