पुणे : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून दुचाकी चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना महापालिका भवन परिसरात घडली. निनाद विनाेद पाचपांडे (३१, रा. वाकड, पिंपरी-चिंचवड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई ऋतिक वाघ यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार निनाद शुक्रवारी (दि. २५) सकाळी चार ते पाचच्या सुमारास भरधाव वेगात महापालिका भवन परिसरातून निघाला होता. रामसर बेकरीसमोर दुचाकीस्वार निनाद याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली. दुचाकीस्वार निनाद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणाची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, उपनिरीक्षक मोहिनी जाधव पुढील तपास करीत आहेत.