मध्यवस्तीत महिला चालवत होती चक्क भांग गोळ्या तयार करण्याचा कारखाना; पुण्यातील खळबळजनक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:10 IST2025-09-12T19:09:45+5:302025-09-12T19:10:24+5:30
पोलिसांनी यंत्रसाम्रुगी, भांगेच्या गोळ्या तयार करण्याचे साहित्य असा १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला

मध्यवस्तीत महिला चालवत होती चक्क भांग गोळ्या तयार करण्याचा कारखाना; पुण्यातील खळबळजनक प्रकार
पुणे : शहराच्या मध्यवस्तीमध्ये एका ठिकाणी भांगेच्या गोळ्या विकणाऱ्या महिलेला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत गंज पेठेतील एका खोलीत ती भांगेच्या गोळ्या तयार करण्याचा चक्क कारखाना चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथील यंत्रसाम्रुगी, भांगेच्या गोळ्या तयार करण्याचे साहित्य असा १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला आहे. रोहिनी सुरेश चव्हाण (५२, रा. त्रिशुल मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार आशिष चव्हाण यांना गंज पेठ येथे एक महिला भांगेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना याची माहिती दिल्यानंतर एपीआय अनिता तोंडे, अर्जुन कुदळे, पीएसआय महेंद्र कांबळे, पोलिस हवालदार तांबोळी, पोलिस अंमलदार आशिष चव्हाण, नदाफ, पठाण, गायकवाड, महिला अंमलदार रूपनवार हे पथक गंज पेठ येथील फायर ब्रिगेड स्टेशनजवळ गेले. तेथे घरासमोरील अंगणात जिन्याजवळ एक महिला बसलेली दिसली. तिच्याकडे प्लॉस्टिकच्या पिशव्यांमध्ये काहीतरी असल्याचे दिसले. त्यावरुन पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडील पिशवीची तपासणी केली. त्यात भांगेच्या गोळ्या दिसून आल्या. २८ हजार रुपयांचे २८० भांगेचे गोळे आणि ४४० रुपये रोख मिळून आले. तिला भांगेच्या गोळ्या कोठून आणले याबाबत विचारणा केल्यावर तिने घराच्या बाजूस एक रूममध्ये माल बनवत असल्याचे सांगितले. पोलिसांनी खोलीमध्ये प्रवेश केल्यावर तेथे भांग तयार करण्याची ७ गोण्या पावडर, भांगेच्या गोळे तयार करण्याचे मशीन, टेबल, मोटार, वजनकाटे, मापे, लोखंडी शेगडी, फ्रीज असा १ लाख २१ हजार २७० रुपयांचा माल मिळून आला. सहायक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे पुढील तपास करत आहेत.