नम्रता फडणीस
पुणे: दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून, लोन ॲप, टास्क फ्रॉड, शेअर गुंतवणुकीतील ज्यादा पैशांचे आमिष तसेच सेक्सस्टॉर्शनसारख्या नानाविविध क्लुप्त्या वापरून अभियंत्यांसह नोकरदार, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन गंडा घातला जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर गुन्हेगारीचा ट्रेंड बदलला असून, ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या कारवाईची भीती घालून लाखो रुपये पाठविण्यास लोकांना भाग पाडले जात आहे. पुण्यात वर्षभरात १३६ कोटी ७३ लाख ६६ हजार ४१९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची आकडेवारी समोर आली असून, त्यातील केवळ ७४ लाख २७ हजार २९२ रुपयांची वसुली करण्यात पुणेपोलिसांना यश मिळाले आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेकडे सायबर फसवणुकीच्या १४० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी पुण्यातील आर्थिक व गुन्हे शाखेकडे सायबर फसवणुकीसंदर्भात माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सायबर फसवणुकीच्या रकमेच्या आकड्याने जवळपास शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. भारतीय स्टेट बँक, मुंबईकडून दुर्वे यांना माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात वर्षभरात डेबिट / क्रेडिट कार्ड हॅक करून ग्राहकांच्या बँकेतील खात्यातून २ लाख ३५ हजारांची फसवणूक करण्यात आली असून, बँकेकडून ५ कार्ड ब्लॉक करण्यात आली आहेत. तर इंटरनेट बँकिंगद्वारे खात्यातून १ कोटी १७ लाख ७८ हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. त्यामुळे बँकेने ८५ खाती ब्लॉक केली आहेत. सायबर फसवणुकीचे वाढते हे आकडे पाहिल्यानंतर आगामी वर्षात सायबर गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
पेन्शन, गॅस कनेक्शनच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याबाबत ग्राहक न्यायालयात दावा दाखल करूनही लवकर निकाल लागत नाही. पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला जात नाही. सायबर फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास जलदगतीने होऊन गुन्हेगारांना अटक व्हायला हवी. - विहार दुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
एका महिलेच्या खात्यावरून सायबर चोरट्यांनी वीस लाखांचे कर्ज काढले आणि ती रक्कम त्यांच्या खात्यातून काढून घेतली. महिलेने कर्ज काढले नसूनसुद्धा आता तिला बँकेचे कर्ज फेडण्याची वेळ आली आहे. अशा घटनांमुळे कुटुंबातील मानसिक स्थैर्य हरवत चालले आहे. मुळात अशा प्रकरणांमध्ये बँकेची जबाबदारी खूप मोठी आहे. इतक्या मोठ्या रकमेचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होत असेल तर बँकेने चौकशी केली पाहिजे. ठराविक रकमेचा व्यवहार हा बँकेतूनच केला पाहिजे, अशी अट बँकेने ठेवली पाहिजे. - ॲड. राजेंद्र काळेबेरे, वकील, जिल्हा व सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय