रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 20:10 IST2025-07-19T20:10:03+5:302025-07-19T20:10:49+5:30
जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते

रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत
आळंदी: संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आज (दि. २०) माऊलींच्या दर्शनाला आळंदीत येणार आहे. रात्री आठच्या सुमारास संत ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराजांचा भेट सोहळा संपन्न होईल. त्यानंतर तुकोबारायांचा पालखी सोहळा माउलींच्या मंदिरातील कारंजा मंडपात मुक्काम करणार आहे.
जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले होते. देहू देवस्थानने आळंदीकरांचे हे निमंत्रण स्वीकारून पालखी सोहळा आळंदीत घेऊन येण्याची तयारी दर्शवली. तब्बल १७ वर्षानंतर तुकोबाराय माउलीच्या भेटीला येत असल्याने आळंदीत दोन्ही सोहळ्यांचे जंगी स्वागत केले जाईल. सोहळ्याच्या आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
माउलींची पालखी सायंकाळी ५ वाजता आळंदीत दाखल होईल. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पालखीची मंदिर प्रदक्षिणा घेऊन ‘श्रीं’च्या पादुका गाभाऱ्यात स्थापन केल्या जातील. त्यानंतर विधिवत आरती होईल. मानकरी व सेवेकरी यांना नारळ प्रसाद देण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल होईल. मंदिर प्रदक्षिणा करून सायंकाळी ७.३० वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील कारंजा मंडपात तुकाराम महाराजांच्या पादुका आणून आरती घेण्यात येईल. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पादुका ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात दर्शनासाठी नेण्यात येतील. तदनंतर रात्रभर भाविकांना संतांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाईल. सोमवारी (दि. २१) सकाळी सहाला विधिवत पूजेनंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू नगरीकडे जाण्यासाठी मार्गस्थ होईल. महाद्वार - भराव रस्ता - वडगाव चौक - हजेरी मारुती मंदिर - नगरपालिका चौक - जुना पूलमार्गे देहू फाट्यावरून डुडुळगाव - मोशीमार्गे सोहळा स्वगृही परत जाईल. दरम्यान दोन्ही पालख्यांच्या आगमनासाठी नगरपालिका, पोलिस प्रशासन व आळंदी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. आळंदी शहरातील वाहतुकीत बदल केला असून अवजड वाहन तसेच इतर वाहनांना शहरात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे.