बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी निघालेल्या दुचाकीस कंटेनरची धडक; एकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:17 IST2023-02-20T12:17:34+5:302023-02-20T12:17:49+5:30
कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी निघालेल्या दुचाकीस कंटेनरची धडक; एकाचा जागीच मृत्यू
शेलपिंपळगाव : बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी निघालेल्या दुचाकीस चाकण - शिक्रापूर राज्यमहामार्गावर साबळेवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीत कंटेनरने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला. सदरची घटना शनिवारी (दि.१८) सकाळी अकराच्या सुमारास साबळेवाडी येथील धोकादायक वळणावर घडली. अपघातात बहुळ ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष दत्तात्रय साळुंके (वय ५४ रा. बहुळ ता.खेड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत दशरथ रामभाऊ वाडेकर (वय ५८ रा.बहुळ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दशरथ वाडेकर व सुभाष साळुंके हे दोघेजण स्वतःकडील दुचाकीवरून सणसवाडी येथे बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी चालले होते. दरम्यान साबळेवाडी हद्दीतील धोकादायक वळणावर पाठीमागून येणाऱ्या अवजड कंटेनरने दुचाकीस धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील दोघेजण रस्त्यावर पडले. यामध्ये सुभाष साळुंके हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी नागरिकांच्या मदतीने त्यांना प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.