पुण्यातील 'त्या' घटनेला धक्कादायक वळण; लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् केला खून, नेमकं काय घडलं?
By किरण शिंदे | Updated: February 18, 2026 14:11 IST2026-02-18T14:09:30+5:302026-02-18T14:11:01+5:30
महिला वेश्याव्यवसाय करणारी महिला असून ८ फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होती

पुण्यातील 'त्या' घटनेला धक्कादायक वळण; लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् केला खून, नेमकं काय घडलं?
पुणे : पुण्यातील भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेचा ६ जणांनी मिळून खून केलाय. शफिया सलीम शेख (वय ४०, दांडेकर पूल)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. १० फेब्रुवारी रोजी मांगडेवाडी येथील एका क्रशर खाणीत तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शफिया शेख ही महिला वेश्याव्यवसाय करणारी महिला आहे. ८ फेब्रुवारीच्या रात्री साडेनऊच्या सुमारास ती कोंढवा परिसरातील कान्हा चौकात मद्यधुंद अवस्थेत उभी होत्या. त्यावेळी आरोपी केशव कमलेश चौधरी (२०), सोन्या लक्ष्मण पवार (१८) आणि अब्दुल मोहम्मद शेख (२३) यांनी त्यांना पाहिले. तिघांनी शफिया यांना कात्रज येथील एका लॉजवर घेऊन जायचं ठरवले. मात्र लॉजवर न नेता त्यांना मांगडेवाडी येथील क्रशर खाणीजवळील डोंगरावर नेण्यात आले. त्यानंतर काही वेळातच इतर आरोपी महादेव अर्जुन व्होरडे (४०), साई अमित पुजारी (१९) आणि सोहेल हनीफ खान (२०) तेथे पोहोचले.
मयत शाफिया आणि आरोपी डोंगरावर मद्यपान करत असताना शफिया यांनी आपल्याला लॉजवर न नेता डोंगरावर का आणले, असा सवाल करत आरोपींसोबत वाद घातला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी संतापाच्या भरात शफिया यांना मारहाण केली. त्यानंतर सुमारे ५० ते ५५ फूट खोल असलेल्या खाणीत त्यांना ढकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
मृतदेह सापडल्यानंतर उलगडा
१० फेब्रुवारी रोजी खाणीत महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे.