खासगी विद्यापीठाला तब्बल अडीच कोटींचा गंडा; लंडनच्या विद्यापीठातून शिकलेला उच्चशिक्षित आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:56 IST2025-09-25T13:56:11+5:302025-09-25T13:56:32+5:30
विशेष म्हणजे, आरोपीने लंडन येथे मास्टर्स अन् बर्मिंगहम विद्यापीठातून पीएच.डी.चे शिक्षण घेतले आहे. बेटिंगच्या नादामुळे त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले

खासगी विद्यापीठाला तब्बल अडीच कोटींचा गंडा; लंडनच्या विद्यापीठातून शिकलेला उच्चशिक्षित आरोपी गजाआड
पुणे: रिसर्च फंडिंग अपॉर्च्युनिटी प्रोजेक्टसाठी शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला असून, यासाठी दोन टक्के रक्कम भरायची आहे, असे सांगत माजी कुलगुरु यांच्या नावाचा वापर करून आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांच्या नावाने सायबर चोरट्याने शहरातील नामांकित खासगी विद्यापीठाला २ कोटी ४६ लाख रुपयांना गंडा घातला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. याबाबत विद्यापीठाच्या शैक्षणिक अधिकाऱ्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ जुलै ते २६ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला हैद्राबाद, तेलंगणा येथून ताब्यात घेत अटक केली. सीतैया किलारू (३४, रा. मेहेर रोड, याप्रल, हैदराबाद) असे उच्चशिक्षित आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आरोपीने लंडन येथे मास्टर्स अन् बर्मिंगहम विद्यापीठातून पीएच.डी.चे शिक्षण घेतले आहे. बेटिंगच्या नादामुळे त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले. हा प्रकार २५ जुलै ते २६ ऑगस्टदरम्यान घडला, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहरातील एका खासगी विद्यापीठात शैक्षणिक अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंच्या नावाने एक मेसेज आला. माजी कुलगुरू हे आयआयटी मुंबईचे प्राध्यापक म्हणून काम पाहत होते. २५ जुलै रोजी त्यांच्या मोबाइलवरून मेसेज आला की, रिसर्च फंडिंग अपॉर्च्युनिटी प्रोजेक्टकरिता डॉ. चेतन कामत ही व्यक्ती संपर्क करील. त्यात कामत यांचा मोबाइल नंबरही दिला होता. त्यानंतर त्या नंबरवरून चेतन कामत नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण आयआयटी मुंबईमध्ये प्राध्यापक असून आयआयटी मुंबई विद्यापीठासोबत आपल्याला एकत्रितपणे संशोधन प्रकल्पावर काम करायचे असल्याचे सांगितले. तसेच यासाठी शासनाच्या तीन वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला असून, त्यापैकी दोन टक्के रक्कम भरा असे सांगितले. यानुसार विद्यापीठाने २ कोटी ४६ लाख रुपये भरले. त्यानंतर या प्रकल्पाबाबत सामंजस्य करार करण्यासाठी कामत यांना खासगी विद्यापीठामध्ये येण्यास सांगितले. परंतु, २६ ऑगस्टपासून त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे फिर्यादींनी आयआयटी मुंबई येथे संपर्क साधून चेतन कामत यांचा नंबर घेतला. त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी कोणत्याही प्रकल्पाबाबत कोणाशीही चर्चा केली नसल्याचे कामत यांनी फिर्यादींना सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी कुलसचिवांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पीएच.डी.धारक, यूपीएससी पास झालेला उच्चशिक्षित आरोपी
आरोपी सीतैया किलारू हा मूळचा विजयवाडा येथील असून तो हैदराबाद येथे वास्तव्याला आहे. २०१० साली त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. २०१० ते २०१४ दरम्यान तो मास्टर डिग्रीसाठी लंडन येथील स्टॅफोर्डशायर विद्यापीठात गेला. याचवेळी त्याने बर्मिंगहॅम विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. २०१५ ते २०१६ दरम्यान त्याने कोनेरू विद्यापीठ, हैदराबाद येथे नोकरी केली. त्यानंतर २०१६ ते २०१८ दरम्यान बीआरआयटी विद्यापीठात नोकरी केली. २०१९-२०२० मध्ये तो यूपीएससी पूर्व आणि मुख्य परीक्षा पास झाला. २०२१ मध्ये यूपीएससीसंदर्भात ऑनलाइन क्लासेस सुरू केले. ऑनलाइन बेटिंगचा नाद लागल्याने २०२२ मध्ये कौटुंबिक वाद झाल्याने त्याची बायको-मुले त्याला सोडून गेली. त्यानंतर त्याने नोकरी न करता ऑनलाइन बेटिंगचा मार्ग अवलंबला.
स्वत:च्या बँक खात्यात पैसे घेतल्याने सापडला
आरोपीला ऑनलाइन बेटिंगचे व्यसन असल्याने त्याने आतापर्यंत पाच कोटी रुपये बेटिंगमध्ये खर्च केले. बेटिंगसाठी पैसे लागत असल्याने त्याने हा पर्याय निवडला. शहरातील अन्य एका खासगी विद्यापीठालाही त्याने मेलद्वारे संपर्क साधल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. २ कोटी ४६ रुपये त्याने स्वत:च्या बँक खात्यात घेतल्याने, पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचणे सोपे झाले. आलेल्या पैशांतून त्याने एक चारचाकी विकत घेतली, पूर्वी त्याची उधारी सासऱ्याने चुकती केली असल्याने त्यांचे पैसे परत केले, तो ज्या ठिकाणी भाड्याने राहत होता, त्या घरमालकाला १२ महिन्यांचे भाडे ॲडव्हान्स दिले. तसेच बेटिंगमध्ये १५ ते २० दिवसांत दीड कोटी रुपये त्याने उडवले. पोलिसांनी त्याची बँक खाती फ्रिज केली असून दोन बँक खात्यांत मिळून २९ लाख रुपये असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वीही हैदराबाद आणि तेलंगणा येथील सायबर पोलिस ठाण्यांत विविध गुन्हे दाखल आहेत. पुणे सायबर पोलिसांनी आरोपीकडून १० डेबिट कार्ड, १२ पासबुक, सोनेखरेदीच्या पावत्या, ४ मोबाइल, १ टॅब, १ लॅपटॉप, १ लाख ५ हजारांचे दागिने, दोन चारचाकी असा ४९ लाख ७५ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, निरीक्षक संगीता देवकाते, पोलिस कर्मचारी संदीप मुंढे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंडे, संदीप कारकूड, टीना कांबळे, अमोल कदम, सचिन शिंदे, सुप्रिया होळकर, गंगाधर काळे, अदनान शेख, सतीश मांढरे, कृष्णा मारकर यांच्या पथकाने केली.