Accident: मजुरीवर कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; वेल्हे तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 16:40 IST2022-02-08T16:40:07+5:302022-02-08T16:40:24+5:30
व्यक्तीच्या मागे पत्नी दोन लहान मुली व एक मुलगा असा परिवार आहे

Accident: मजुरीवर कुटुंब चालवणाऱ्या व्यक्तीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; वेल्हे तालुक्यातील घटना
मार्गासनी : वेल्हे-नसरापूर रस्त्यावर आस्कवडी ( ता.वेल्हे )गावा जवळील वळणावर समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या तवेरा गाडीने दिलेल्या धडकेत मोटरसायकल चालक दत्तात्रय सिताराम मांगडे ( वय ,४० ,रा.मांगदरी, ता.वेल्हे ) यांचा जागीच मुत्यु झाला. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी तवेरा चालक विठ्ठल अनिरुद्ध ढेरे ( वय २६ ,रा.कात्रज, पुणे ) यास आज अटक केली आहे. या बाबत वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस.एस.बांदल तपास करत आहेत.
दत्तात्रय मांगडे यांची घरची परिस्थिती हालाखीची आहे. मजुरीवर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन लहान मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने मांगदरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात काल रविवारी (६) सांयकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडला. दत्तात्रय मांगडे हे मोटरसायकल वरुन भाजीपाला खरेदी करण्यासाठी वेल्हेकडे चालले होते. त्यावेळी आस्कवडी येथील साई हाँटेल जवळील वळणावर नसरापूरकडे जाणाऱ्या तवेरा गाडीने मोटरसायकला धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. माहिती मिळताच वेल्हे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.