'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:10 IST2025-11-15T11:08:41+5:302025-11-15T11:10:29+5:30
नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल

'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
धायरी : नवले पूल परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघाताने पुणे शहर हादरले असताना, या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना सरकारने जाहीर केलेल्या ५ लाख रुपयांच्या तुटपुंज्या मदतीमुळे संतप्त नातेवाइकांनी सरकारवर कडक आणि जहाल शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाच लाख रुपये एका माणसाची किंमत आहे का? लाज वाटली पाहिजे सरकारला, अशा जहाल शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची मालिका आणि त्यामध्ये निष्पाप लोकांचा बळी जाण्याची भयाण परंपरा कायम असताना, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना केवळ ५ लाख रुपयांची मदत जाहीर करणे, म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. संतप्त नातेवाइकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, या रकमेवर अत्यंत संताप व्यक्त केला आहे.
एका माणसाच्या आयुष्याची किंमत सरकारने फक्त ५ लाख रुपये लावली आहे का? हा निव्वळ अपमान आहे! सरकारला याची लाज वाटली पाहिजे. आमच्या घरातील व्यक्तीचा जीव गेला आहे, त्याची भरपाई पैशाने होऊ शकत नाही. पण, ५ लाख रुपये देऊन सरकारने आमच्या दुःखाची आणि माणुसकीची निव्वळ थट्टा केली आहे, असे संतप्त उद्गार एका नातेवाइकाने काढले.
या अपघातासाठी प्रशासनाची उदासीनता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिरंगाई आणि केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून वेळ मारून नेण्याचे सरकारी धोरणच जबाबदार असल्याचा थेट आरोप नातेवाइकांनी केला आहे. नवले पूल हा ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असतानाही, गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? हा संतप्त नातेवाइकांचा थेट सवाल आहे.
आणखी कोणाचा बळी जायला नको
आणखी कोणाच्या घरातील व्यक्तींचा बळी जायला नको, अशी कळकळीची मागणी करत, संतप्त नातेवाइकांनी सरकारला खडसावले आहे. त्यांना तात्कालिक मदत नको आहे, तर भविष्यात असे अपघात पुन्हा होणार नाहीत. दोषी अधिकारी आणि एजन्सीवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कडक कारवाई करा. सरकारने केवळ तोंडी दुःख व्यक्त करून आणि तुटपुंजी मदत जाहीर करून आपले कर्तव्य संपले असे समजू नये. पीडितांच्या संतापाला गांभीर्याने घेऊन ठोस उपाययोजना करणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.