विवाहित महिलेचे हात ओढणीने बांधून शेततळ्यात बुडवले; बारामतीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:29 IST2023-12-25T13:29:30+5:302023-12-25T13:29:52+5:30
विवाहितेचा मानसिक छळही करण्यात येत होता

विवाहित महिलेचे हात ओढणीने बांधून शेततळ्यात बुडवले; बारामतीतील घटना
सुपे : विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करीत तिचे दोन्ही हात ओढणीच्या साहाय्याने बांधुन शेततळ्यात बुडवुन खुन केल्याची घटना बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे घडली. सुरेखा भाऊसाहेब गडदरे असे खून झालेल्या विवाहीत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती भाऊसाहेब महादेव गडदरे, सासू ठकूबाई महादेव गडदरे (रा. मासाळवाडी), नणंद आशा सोनबा कोकरे व नंदावा सोनबा चंदर कोकरे (रा. कुतवळवाडी, ता. बारामती) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नामदेव बबन करगळ (रा. गिरीम, ता. दौंड) यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्यादीची मुलगी सुरेखा हिला या चौघांनी शारिरिक, मानसिक छळ करत त्रास दिला. पती भाऊसाहेब व सासू ठकूबाई यांनी तिचे दोन्ही हात लाल रंगाच्या ओढणीने बांधून घराजवळील शेततळ्यात तिला पाण्यात बुडवून मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रविवारी ( दि. २४ ) सकाळी सात वाजण्याच्या पूर्वी मासाळवाडीतील भगवान बिरा गडदरे यांच्या शेततळ्यात ही घटना घडली. दरम्यान बारामतीचे उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लवटे अधिक तपास करत आहेत.