भोर रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक;एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:50 IST2025-06-11T11:50:08+5:302025-06-11T11:50:55+5:30
नागरिकांच्या मदतीने आणि वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दोघांना तातडीने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भोर रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक;एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
पुणे - कापूरव्होळ–भोर रस्त्यावर माळवाडी गावच्या हद्दीत काल (१० जून) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव शुभम राजेंद्र पवार (वय २७) असून, गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव कुणाल जालिंदर खोपडे (दोघेही रा. आळंदे, ता. भोर) असे आहे. हे दोघे दुचाकी (क्र. एम.एच. १२ पी.एक्स. ९९७९) वरून भोरकडे येत असताना, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या व्हॅगनर कारने (क्र. एम.एच. १२ एल.जे. ०५६१) माळवाडीच्या हद्दीत समोरासमोर जोरदार धडक दिली.
दरम्यान, धडकेनंतर दोघेही रस्त्यावर फेकले गेले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने आणि वाहतूक पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे दोघांना तातडीने भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी शुभम पवार याला मृत घोषित केले. या अपघाताबाबत राजगड पोलीस अधिक तपास करत असून, कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्राथमिक माहितीतून समजते.