पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे - अंजली दमानिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 20:47 IST2025-12-23T20:46:50+5:302025-12-23T20:47:35+5:30
अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टी माहिती होत्या. मात्र, चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही

पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे - अंजली दमानिया
पुणे : मुंढवा प्रकरणात अमेडिया कंपनीचे गुंड मुंढवामध्ये जागा ताब्यात घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए वारंवार त्यांच्या संपर्कात होते. अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टी माहिती होत्या. मात्र, चौकशीमध्ये काही निष्पन्न होत नाही. अजित पवार यांच्या विरोधात सिंचन घोटाळा पुरावे सर्व दिले होते. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबतच शपथविधी केला, ही गोष्ट चुकीची होती. शीतल तेजवानी हिने न्यायालयात अनेक केस दाखल केल्या आहेत. त्यामुळे खरी चौकशी होत नाही, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुंढवा प्रकरणात दोन एफआयआर झाल्या आहेत. बावधनमध्ये केवळ मुद्रांक शुल्क बुडवले, याबाबत तक्रार आहे. पुढे त्यात काही निष्पन्न होणार नाही. टप्प्याटप्प्याने पोलिस कारवाई सुरू आहे. परंतु, या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दमानिया म्हणाल्या, या गुन्ह्यात एक एफआयआर पाहिजे आणि एक तपास अधिकारी हवा. नाहीतर तपासाची दिशा भरकटणार आहे. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील आले नाहीत तर पार्थ पवार कधी येणार आहे. दिग्विजय पाटील यांना पोलिसांनी बोलावले. त्यावेळी गोडी गुलाबीत चौकशी झाली आहे. लोक ही केस विसरून जातील, असे सत्ताधाऱ्यांना वाटत असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले.
हे घोटाळा प्रकरण उघड होऊन पावणेदोन महिने झाले असतानाही अद्याप पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. ते उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय निर्माण होत आहे, असे दमानिया यांनी सांगितले. या प्रकरणात लवकरात लवकर सर्व दोषींवर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही अंजली दमानिया यांनी दिला आहे.