अश्लील व्हिडिओ पाठवणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 16:26 IST2022-12-18T16:26:47+5:302022-12-18T16:26:59+5:30
व्हिडिओमध्ये महिलांविषयी घाणेरडी भाषा करुन लैंगिक स्वरुपाचे टोमणे मारले

अश्लील व्हिडिओ पाठवणारे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
पुणे : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविरुद्ध अश्लील आक्षेपार्ह आरोप करुन महिलांविषयी लैंगिक टोमणे वापरुन व्हिडिओ पाठविणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार शनिवारी त्यांच्या लक्षात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला या त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह तसेच खालच्या भोषत बोलताना दिसले, असा आरोप महिलेने केला आहे. या व्हिडिओमध्ये महिलांविषयी घाणेरडी भाषा करुन लैंगिक स्वरुपाचे टोमणे मारले आहेत. हे ऐकून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला असून दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.