पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 17:20 IST2022-09-30T17:19:14+5:302022-09-30T17:20:09+5:30
सद्यस्थितीत तरुणांना हृदयविकार होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पुणे : बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव यामुळे हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार वाढले आहेत. पूर्वी साधारण वयाच्या पन्नाशीनंतर हृदयविकार होत असे. परंतु, सद्यस्थितीत तरुणांना हृदयविकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अगदी ३० ते ४० वर्षांच्या तरुणांना हृदयविकार होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या २५ वर्षीय तरुणीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पूजा वसंत राठोड (वय २५, कोंडी तांडा, उत्तर सोलापूर), असे या तरुणीचे नाव आहे.
पूजा ही बहिणीसोबत पुण्यात राहत होती. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असतांना खासगी कंपनीमध्ये काम करत होती. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अभ्यासिकेमध्ये अभ्यास करीत असताना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी जवळ अभ्यास बसलेल्या विद्यार्थ्यांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. तिच्या पश्चात आई-वडील, भाऊ- बहिण, असा परिवार आहे.
काय म्हणतात हृदयरोग तज्ज्ञ
सकस आहार हा आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचा विकार न होण्यास मदत होते. कडधान्ये, डाळी आणि चरबी कमी असलेले पदार्थ आदींचा आहारात समावेश करायला हवा, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
सतत एकाच जागी बसू नये. साधारणतः किमान अर्धा किंवा एक तासानंतर उठून चालावे. ज्यांना शक्य आहे, त्यांनी उभे राहून काम करावे. एकाच जागी बसल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. एक मिनिटात किमान १०० पावले तरी चालावे, असे तज्ज्ञांनी सांगितले.
काय काळजी घ्यावी
- नियमित व्यायाम करा.
- संतुलित आहार घ्यावा.
- नेहमी तणावमुक्त राहावे.
- व्यसनांपासून दूर राहावे.
- पुरेशी झोप घ्यावी.