६ महिन्यात भोरमध्ये सर्पदंशाच्या ९७ घटना, सर्व रुग्णांवर उपचार, एकही मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:25 IST2024-12-09T10:24:48+5:302024-12-09T10:25:03+5:30

शेतीच्या पेरणी, लावणी व कापणीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वाधिक सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले आहे

97 cases of snakebite in Bhor in 6 months all patients treated no death | ६ महिन्यात भोरमध्ये सर्पदंशाच्या ९७ घटना, सर्व रुग्णांवर उपचार, एकही मृत्यू नाही

६ महिन्यात भोरमध्ये सर्पदंशाच्या ९७ घटना, सर्व रुग्णांवर उपचार, एकही मृत्यू नाही

भोर : भोर तालुक्यात भातशेतीच्या कामासाठी शेतकरी सर्वांत जास्त वेळ शेतात राबत असताना याच काळात सर्पदंशांच्या घटनेत वाढ होत असते. मागील सहा महिन्यांत भोर तालुक्यात सर्पदंशाच्या ९७ घटना घडल्या असल्याची नोंद आहे. त्यांतील ८६ जणांवर भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात, तर तीन जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचार केले; तर आठ जणांना उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. सर्पदंशामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

भोर तालुका दुर्गम, डोंगरी असून पाऊसही अधिक असतो. इथे पावसावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. शेतीच्या पेरणी, लावणी व कापणीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वाधिक सर्पदंश झाल्याचे निदर्शनास येते. याच सहा महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक २७ सर्पदंश हे जुलै महिन्यात झाले आहेत. जूनमध्ये १४, ऑगस्टमध्ये २०, सप्टेंबर १३, ऑक्टोबर १५, तर नोव्हेंबर ८ असे एकूण ९७ जणांना सर्पदंश झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यातील ९४ जणांनी उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात गेले. त्यांतील ८६ रुग्णांना भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचार केले. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यकेंद्रात तीन (आरोग्यकेंद्रे भुतोंडे येथे एक व भोंगवली दोन) अशा एकूण ८९ जणांवर तालुक्यात उपचार करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातून तर आठ रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. भोर तालुक्यातील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या सात आरोग्यकेंद्रांत मागील पाच महिन्यांत सर्पदंशाचे १४ रुग्ण गेले होते. पैकी ११ रुग्णांना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले होते. तिघाजणांना आरोग्य केंद्रातच उपचार करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशाच्या आलेल्या सर्व रुग्णांना तातडीने तपासणी करून उपचार सुरू करण्यात येतात. विविध सर्पदंशांवरील पुरेसा औषधसाठा असल्याने उपचार करताना अडचणी आल्या नाहीत. ज्यांना अतिदक्षता विभागाची गरज होती, त्यांना पुढे पाठवण्यात आले. उर्वरित सर्वांना सर्पदंशावरील लस व उपचार करून बरे करण्यात आले. सर्पदंशात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. - डॉ. आनंद साबणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, भोर

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार गरजेचे असते. त्यामुळे तातडीने अशा रुग्णांना जवळच्या आरोग्यकेंद्रात न्यावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील लस उपलब्ध असून जवळपास २०० लसी शिल्लक आहेत. - डॉ. जयदीपकुमार कापसीकर, तालुका वैद्यकीय अधिकारी, भोर

Web Title: 97 cases of snakebite in Bhor in 6 months all patients treated no death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.