भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 20:18 IST2025-07-25T20:18:27+5:302025-07-25T20:18:38+5:30

जून महिन्यात भाटघर धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने कमी पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.

90% water in Bhatghar dam; Still water shortage in Bhor city; Citizens angry | भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप

भाटघर धरणात ९०% पाणी; तरीही भोर शहरात पाणीटंचाई; नागरिकांचा संताप

भोर : भाटघर धरणात ९० टक्के पाणीसाठा असूनही भोर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून दिवसाआड आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जून महिन्यात भाटघर धरणात केवळ ८ टक्के पाणीसाठा होता. त्यावेळी नगरपालिका प्रशासनाने कमी पाणीसाठ्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. आता धरणात ९० टक्के पाणी असूनही हीच परिस्थिती कायम आहे. वीज खंडित झाल्यास पंप बंद पडतात, त्यामुळे काही वेळा दोन-दोन दिवस पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

भाटघर धरणाच्या भिंतीखाली असलेल्या विहिरीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणातून चारीद्वारे विहिरीत पाणी आणले जाते, पण धरणातील पाणीसाठा कमी असल्यास विहिरीत पुरेसे पाणी येत नाही. शिवाय, धरणावरील वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमतेचे प्रत्येकी दोन पंप आहेत, पण अपुरा पाणीपुरवठा आणि कमी दाब यामुळे नागरिकांना स्वच्छ पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

दरवर्षी तेच तेच

दरवर्षी मे महिन्यात भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने भोर शहरात पाणीटंचाई निर्माण होते. यावर भोर नगरपालिकेकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याने ही समस्या कायम आहे. १३ कोटी रुपये खर्चून नवीन नळपाणी पुरवठा योजना राबवली गेली, पण वीजनिर्मिती केंद्र बंद असल्याने विहिरीत पाणी कमी पडते. यामुळे ही योजना अपुरी ठरत आहे.

१८ लाखांचा खर्च, तरीही अपुरा पाणीपुरवठा

नगरपालिका दरवर्षी पाटबंधारे विभागाला १८ लाख रुपये देते, पण तरीही नियमित पाणीपुरवठा होत नाही. यावर उपाय म्हणून भोर शहर शिवसेना प्रमुख नितीन सोनावले यांनी थेट धरणात वीजपंप टाकून पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यामुळे पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा त्यांचा दावा आहे.

Web Title: 90% water in Bhatghar dam; Still water shortage in Bhor city; Citizens angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.