Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:17 IST2025-05-21T11:17:04+5:302025-05-21T11:17:29+5:30
पुणे शहरात कोरोनाची स्थिती पूर्णपणे आटोक्यात असल्याचे पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या प्रमुखांनी सांगितले आहे

Corona Virus: कोरोनाच्या पुण्यातील ८७ वर्षीय रुग्णाची तब्येत ठणठणीत; उपचारानंतर घरी सोडले
पुणे: सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्ण वाढल्याने काळजी घेण्यात येत आहे. पुणे शहरात कोरोनाचा एक ८७ वर्षीय रूग्ण सापडला होता. त्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत आहे. पुणे शहरातील एक ८७ वर्षीय कोरोना रूग्ण उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्याची कोरोनाची टेस्ट करण्यात आली. ही टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर या रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. त्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत आहे. कोरोनाची स्थिती पूर्णपणे पुणे शहरात आटोक्यात आहे, असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. निना बोराडे यांनी सांगितले.
राज्यात मे महिन्यात दि. १९ अखेर ६७३ चाचण्यांद्वारे ८७ रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले आहे. त्यापैकी ३१ बरे झाले, तर ५६ जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. मात्र, कोरोना विषाणूचा सध्याचा व्हेरियंंट सौम्य स्वरूपाचा असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र योग्य ती काळजी घ्यावी, असे वैद्यक तज्ज्ञांचे मत आहे. कोरोनाचे सर्व सक्रिय रुग्ण मुंबईतील आहेत. रुग्ण वेगवेगळ्या परिसरातील असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये एकही सक्रिय रुग्ण नाही.
यापूर्वी जानेवारीत २ फेब्रुवारीत १ आणि एप्रिलमध्ये ४ रुग्णांचे निदान झाले होते. मार्चमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मोठ्या लाटेचा धोका नसल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा दावा आहे. कोरोनाचा विषाणू पूर्ण नष्ट झाला नसून, अधूनमधून डोके वर काढत आहे. मात्र सध्याचा व्हेरियंट सौम्य आहे आणि मृत्यूदरही अल्प आहे. त्यामुळे कोरोना नागरिकांनी घाबरून जाऊ नये.