पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 19:33 IST2025-01-17T19:32:56+5:302025-01-17T19:33:18+5:30
पुण्यात भीतीच वातावरण तयार झालं होत, मात्र आता गुन्हेगारी कमी झाली आहे

पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा
पुणे : पुणे पोलीस दलात 850 नव्या जागा भरणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पोलीस आयुक्तालय येथे झालेल्या बैठकीत दिली आहे. पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. तसेच त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेत शहरातली कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कदम म्हणाले, पुणे आयुक्तालयाच्या मी आज आढावा घेतला. 100 दिवसाच्या प्लॅनची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याचा आढावा घेतला. पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यात आज माझा पहिला दौरा आहे. पुणे पोलीस प्रशासनाला शासनाकडून काही अपेक्षा आहेत. दरवेळेला आम्ही सूचना करत असतो. परंतु, पोलीस कमिशनर असतील त्यांची सर्व टीम असेल त्यांना प्रशासनाकडून शासनाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांना काय हवं आहे, यावर सुद्धा विचारणा केली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
जिथ चुका होतील तिथं करवाई होणार
पुण्यात भीतीचं वातावरण तयार झालं होतं. आता कोयता गँग अशी काही अस्तित्वात नाही. 2023 पेक्षा 24 मध्ये गुन्हेगारी 50 टक्के कमी झालीये. ड्रग्स विक्रीवर कडक कारवाई झाली पाहिजे. काही गोष्टी घडल्या असतील अणि दादांनी त्यावर बोललं असेल तर त्यात काही गैर नाही. अजितदादांनी ज्या सुचना दिल्या आहेत, त्या प्रशासनाने पाळल्या पाहिजेत. यात दादांचं सुद्धा मार्गदर्शन घेवू. जिथ चुका होतील तिथं करवाई केलीच पाहिजे. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांच आणि मुलांचं समुपदेशन करू तशा सूचना दिल्या आहेत.
2023 च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला
2023 च्या तुलनेत क्राईम रेट शहरात कमी झाला आहे. अनेक गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे, यावर देखील अनेक सुधारणा करणार आहोत. सायबर क्राईममध्ये देखील वाढ झाली आहे. याबाबत स्टाफ वाढवण्याचा सूचना दिल्या आहेत. मुंबई मध्ये संयुक्त इमारत सायबरसाठी आहे, तशीच पुण्यात देखील हवी अशी मागणी करण्यात येणार आहे आणि ती पुर्ण देखील केली जाईल, पोलीस पोलिस प्रशासन आणि मुख्यमंत्री यांच्या मधला मी दुवा आहे, असंही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
पोलिसांना फ्री हॅन्ड देणार
4000 कोटीच ड्रग्स पकडलं होत त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन केलं. ग्राउंड लेवलवर ड्रग्सवरती लक्ष ठेवले पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. 229 कारवाई ड्रग्स प्रकरणी केली आहे, यात कारवाया वाढवा. ड्रग्समध्ये काम करताना पोलिसांना फ्री हॅंड आम्ही देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं आहे.