नशेची तलफ अन् मुंबईची आजी थेट ड्रग्सच्या विळख्यात!पुण्यात २.६ लाखांच्या अमली पदार्थांसह महिलेला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:42 IST2026-02-12T16:40:05+5:302026-02-12T16:42:04+5:30
पुणे पोलिसांनी मुंबईहून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला अटक केली.

नशेची तलफ अन् मुंबईची आजी थेट ड्रग्सच्या विळख्यात!पुण्यात २.६ लाखांच्या अमली पदार्थांसह महिलेला बेड्या
Pune Crime: अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विळख्यात केवळ तरुणच अडकले नसून, तर आता वयस्कर व्यक्तीही याकडे वळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पिंपळे गुरव येथील काशीद पार्क परिसरात ड्रग्सची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या एका ६४ वर्षीय महिलेला सांगवी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. तिच्याकडून सुमारे २.६ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन आणि कोकेन जप्त करण्यात आले आहे.
सांगवी पोलिसांना माहिती मिळाली होती की, मुंबईहून एक महिला पिंपळे गुरव परिसरात अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी काशीद पार्क परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या या महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे अमली पदार्थ सापडले. पोलिसांना तिचे वय पाहून धक्का बसला.
वीणा दीपक शुक्ला (वय ६४) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. वीणा शुक्ला मुंबईच्या जुहू तारा रोड येथे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत महिलेच्या ताब्यातून ११.५ ग्रॅम मेफेड्रोन, ९.७ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या या अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे २ लाख ६० हजार रुपये आहे.
नशेसाठी बनली 'ड्रग्ज कुरिअर'
पोलिसांनी जेव्हा या महिलेची सखोल चौकशी केली, तेव्हा तिने धक्कादायक कबुली दिली. स्वतःला नशेचे व्यसन असल्याने आणि ते भागवण्यासाठी पैसे नसल्यामुळे ती या व्यवसायात उतरली. मुंबईच्या मालाड येथील एका बड्या पुरवठादाराने तिला हे ड्रग्स पुण्यात पोहोचवण्याचे काम दिले होते. या बदल्यात तिला पैसे किंवा स्वतःसाठी अमली पदार्थ मिळणार होता.