पुण्यातील आंबेगावात शाळकरी बस दरीत कोसळून ४४ विद्यार्थी व ५ कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 16:56 IST2022-09-27T16:11:09+5:302022-09-27T16:56:34+5:30
सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

पुण्यातील आंबेगावात शाळकरी बस दरीत कोसळून ४४ विद्यार्थी व ५ कर्मचारी जखमी
घोडेगाव : पिंपळगाव घोडे ता. आंबेगाव येथील मुक्ताई प्रशालेतील शाळकरी मुलांची बस दरीत जाऊन 44 मुले जखमी झाली. तर पाच शिक्षक व कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्व शाळकरी मुले गिरवली आयुका केंद्राची दुर्बीण पाहण्यासाठी गेले होते. ही दुर्बीण उंच डोंगरावर असून येथे जाण्यासाठी संपूर्ण घाट रस्ता आहे. या शाळेची सहल सकाळीच दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. तेथून परतत असताना घाटामध्ये अवघड वळणावर ओल्या रस्त्यावर गाडी घसरली. बस शंभर फूट दरीत गेली व पलटी झाली जागेवर पलटी झाली.
यामध्ये बस मधील 44 मुलांना मार लागला तर शाळेतील चार शिक्षक व वाहन चालक हे ही जखमी झाले. असे एकूण 49 लोक जखमी झाले. सर्व मुलांना तातडीने घोडेगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून यातील नऊ गंभीर मुलांना पुढे मंचर व पुणे कडे हलवण्यात आले. घटना घडल्या बरोबर घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जीवन माने, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, घोडेगावचे अजितशेठ काळे, कैलास बुवा काळे हे रुग्णालयामध्ये दाखल झाले.
घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वनवे व त्यांच्या डॉक्टरांनी तसेच घोडेगाव मधील खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णालयात येवून जखमी मुलांवर उपचार केले. चौकट बसला अपघात झाल्याबरोबर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने पालकांची व बघ्याची गर्दी झाली. यात मुले दगावल्याची अफवाई बाहेर पसरली. मात्र यातील एकही मुलगा दगावलेला नाही सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत. असे संस्थेचे अध्यक्ष अजितशेठ काळे यांनी सांगितले.