तब्बल ४१ वर्ष फरार दरोडेखोर सोलापूरच्या करमाळयातून जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 15:12 IST2021-09-16T15:12:39+5:302021-09-16T15:12:47+5:30
दौंडच्या यवतमध्ये १९८० साली ९ जणांनी टाकलेल्या दरोड्यात आरोपीचा समावेश होता

तब्बल ४१ वर्ष फरार दरोडेखोर सोलापूरच्या करमाळयातून जेरबंद
लोणी काळभोर : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं तब्बल ४१ वर्षे फरार दरोडेखोरास जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे. याप्रकरणी अंकुश माणिक गायकवाड ( वय ५८, रा खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर ) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी जिल्ह्यातील पाहिजे असलेले फरार आरोपी यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके आणि त्यांचं पथक हे जुने रेकॉर्ड वरील फरार आरोपी यांचा शोध घेत होते.
दौंडच्या यवतमध्ये १९८० साली ९ जण दरोडा टाकून सोनं व रोख रक्कम घेऊन गेले होते. यांतील ६ जणांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यातील अंकुश गायकवाड सह ३ जण गुन्हा घडले पासून तब्बल ४१ वर्षे फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत गायकवाड हा करमाळा खडकी रोडवर जनावरे चरायला घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.
सदर पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. दरोड्याच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. यावरून त्यास पुढील तपासाकरीता यवत पोलीसांचे ताब्यात दिले आहे . सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे नेतृत्वाखाली अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने केली आहे.