राज्यात कोरोना बाधित देशातून ४०० वर प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 02:10 PM2020-03-04T14:10:58+5:302020-03-04T14:40:18+5:30

बाधित भागातून आलेल्या एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील

Up to 400 travelers from Corona affected country in the state | राज्यात कोरोना बाधित देशातून ४०० वर प्रवासी

राज्यात कोरोना बाधित देशातून ४०० वर प्रवासी

Next
ठळक मुद्देचीन, दक्षिण कोरिया,जपान, नेपाळ,मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी १७२ प्रवाशांचा पाठपुरावा पुर्ण झाला असून ७३ प्रवासी देखरेखीखाली आहेत.

पुणे : कोरोना विषाणु बाधित देशांतून राज्यात आलेल्या प्रवाशांचा आकडा ४०० च्या पुढे गेला आहे. या प्रवाशांपैकी आतापर्यंत १५२ जणांना राज्यातील विविध रुग्णालयांमधील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील आहेत.

चीनमध्येकोरोना विषाणुचा उद्रेक झाल्यानंतर भारतात येणाऱ्या प्रवाशांची मुंबईसह अन्य आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात येत आहे. दि. ३ मार्चपर्यंत मुंबई विमानतळावर ५५१ विमानांमधील ६५ हजार ६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. चीन, हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया,जपान, नेपाळ,इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया,इराण आणि इटली या १२ देशातील प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. त्यानुसार राज्यात बाधित भागातून ४०१ प्रवासी आले आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या प्रवाशांपैकी सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आढळल्याने प्रवाशांना राज्यातील विविध रुग्णालयांतील विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे. आतापर्यंत १५२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी १४९ जणांचे राष्ट्रीय विषाणु संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्यापैकी १४६ जणांना घरी सोडण्यात आले आहे.

बाधित भागातून आलेल्या एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील आहेत. या प्रवाशांचा आरोग्य विभागाकडून पाठपुरावा केला जात आहे. त्यापैकी १७२ प्रवाशांचा पाठपुरावा पुर्ण झाला असून ७३ प्रवासी देखरेखीखाली आहेत. तर ७२ प्रवाशांना नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ७१ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून मंगळवारी केवळ एक संशयित प्रवासी रुग्णालयात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 
------------

Web Title: Up to 400 travelers from Corona affected country in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.