पुणे : पुणे पुणे शहरात आज आगीच्या चार घटना घडल्याची नोंद अग्निशमन दलाकडे झाली आहे. दुपारच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, कोंढवा मिठानगर, शिवाजीनगर संचेती हॉस्पिटलजवळ आणि येरवडा लक्ष्मीनगर येथे आगीच्या घटना घडल्या आहेत. तीन ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याची माहिती दलाने दिली आहे. तर कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे आगीच्या गंभीररित्या भाजलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीडच्या सुमारास कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी येथे एका सोफा बनविणारया कारखान्यात आग लागली होती. कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द येथून एक वाॅटर टँकर रवाना होत आग आटोक्यात आणली. घटनास्थळी एका छोट्या सिलेंडरचा स्फोट झाला होता तसेच त्याठिकाणी वेल्डिंग करण्याचे ही काम सुरु असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. जवानांनी इतर ठिकाणी आग पसरु न देता पाण्याचा मारा करत सुमारे तासाभरात आग पुर्ण विझवली. या घटनेत एक हरुण हमद खान, (वय ४५) हे गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांना जवानांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आज दुपारी अडीचच्या सुमारास कोंढवा, मिठानगर येथे इमारतीच्या आवारातील इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन दाखल होत त्यांनी आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील धोका टाळला आहे. तसेच जखमी कोणी नसल्याचे दलाने सांगितले आहे. शिवाजीनगर, संचेती हॉस्पिटल जवळ बंद असलेल्या एका घराला (कौलारु+लाकडी) आग लागली होती. अग्निशमन दलाकडून कसबा व नायडू अग्निशमन केंद्र व एक वाॅटर टँकर दाखल झाला. जवानांनी पाण्याचा मारा करत आग पुर्ण विझवली. आगीचे नेमके कारण समजू शकले नसून जखमी कोणी नाही.
आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक
येरवडा, लक्ष्मीनगर, मोझे शाळेजवळ एका घरामध्ये आग लागली होती. तातडीने येरवडा व धानोरी येथील अग्निशमन वाहन रवाना झाली. जवानांनी पहिल्या मजल्यावर आग लागल्याचे दिसून येताच तातडीने पाण्याचा मारा सुरू केला. दाटीवाटीच्या वस्तीत आग इतरञ पसरणार नाही याची दक्षता घेत आग पुर्ण विझवली. आगीचे कारण समजले नसून जखमी कोणी नाही. आगीमध्ये मोठे नुकसान झाले असून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.