फॅक्टरी लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Updated: October 18, 2023 17:01 IST2023-10-18T17:01:07+5:302023-10-18T17:01:20+5:30
कंपनीचे लायसन्स रिन्यू, रिसोर्से चे बिलींग आणि ईमिग्रेशनच्या कामासाठी वेगवेगळी कारणे सांगत टप्प्याटप्प्याने ३३ लाख ५४ हजार ५६ रुपये घेतले

फॅक्टरी लायसन्स रिन्यू करण्याच्या बहाण्याने ३३ लाखांची फसवणूक
पुणे : फॅक्टरी लायसन्स रिन्यू करून देण्याच्या बहाण्याने आठ जणांनी एकाची ३३ लाख ५४ हजार ५६ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बाणेर येथील पुटमन ट्रॅव्हल्स प्रा. लि. येथे १० सप्टेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी विवेक दिलीप कोळी (३२, रा. वाकड) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनुप ढोरमाळे, प्रियंका कौर, प्रमोद, मॉर्गन, रिकी, विल्यम्स, एजंट चाचा, मयंक आगरवाल/गुप्ता यांच्याविरोधात फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कोळी यांच्या कंपनीचे लायसन्स रिन्यू, रिसोर्से चे बिलींग आणि ईमिग्रेशनच्या कामासाठी वेगवेगळी कारणे सांगत कोळी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने ३३ लाख ५४ हजार ५६ रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी लायसन्स रिन्यू करून न देता तसेच इनव्हॉईस बिलिंगची रक्कम न देता कोळी यांची आर्थिक फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोळी यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. सायबर पोलिसांनी हा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात वर्ग केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नेमाने करत आहेत.