Satish Wagh Case: अक्षय अन् मोहिनीचे ११ वर्षांपासून प्रेमसंबंध; सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:34 IST2024-12-26T15:34:20+5:302024-12-26T15:34:44+5:30
अक्षय जेव्हा २१ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे ३७ वर्षांच्या मोहिनी वाघसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले होते

Satish Wagh Case: अक्षय अन् मोहिनीचे ११ वर्षांपासून प्रेमसंबंध; सतीश वाघ हत्या प्रकरणात खळबळजनक माहिती
किरण शिंदे
पुणे: शेतकरी आणि व्यावसायिक असलेले सतीश वाघ यांचे फुरसुंगी परिसरातून नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. सतीश वाघ यांची पत्नी या हत्याकांडामध्ये सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नी मोहिनी वाघ हीचे आपल्याहून पंधरा वर्षांनी लहान असणाऱ्या अक्षय जावळकरसोबत प्रेम संबंध होते. त्यात आडकाठी ठरत असल्यामुळेच सुपारी देऊन सतीश वाघ यांचा खून करण्यात आला.
आरोपी मोहिनी वाघ हिचे वय ४८ आहे. तर आरोपी प्रियकर अक्षय जावळकर हा ३२ वर्षाचा आहे. अक्षय जावळकरचे आई वडील २००१ साली सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या फुरसुंगीतील खोलीत भाड्याने राहायला आले होते. तेव्हा अक्षय ९ वर्षाचा होता. तर सतीश आणि मोहिनी यांचा मुलगाही त्याच वयाचा असल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. दोघेही एकमेकांच्या घरी येत जात होते. मात्र अक्षय जेव्हा २१ वर्षांचा झाला तेव्हा त्याचे ३७ वर्षांच्या मोहिनी वाघसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले.
दरम्यान सिव्हील इंजिनिअर असलेल्या अक्षयचे २०१६ साली लग्न करायचे ठरल्याने अक्षय आणि त्याच्या आई वडिलांनी वाघ यांची भाड्याची खोली सोडून दुसरीकडे राहायला गेले. मात्र लग्नानंतर देखील अक्षय आणि मोहिनी एकमेकांना भेटत राहीले. दोघांचे संबंध समजल्यानंतर सतीश वाघ, मोहिनी आणि अक्षय यांच्यात वाद झाले. मागील अनेक वर्षे त्यांच्यात हे वाद सुरू होते. शिवाय सतीश वाघ हे पत्नी मोहिनीला मारहाण करायचे. त्यामुळे मोहिनी वाघ यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले. अक्षयच्या मदतीने तिने हत्येचा कट रचला. अक्षयने पैशाचे आमिष दाखवून त्याच्या मित्रांना या कटात सहभागी करून घेतले.
त्यानंतर ९ डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सतीश वाघ यांचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी अवघ्या काही मिनीटातच त्यांची हत्या केली .त्यांच्या शरीरावर तब्बल ७० वार करण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. सुरवातीला हे अपहरण पैसांसाठी करण्यात आल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी मोहिनी आणि अक्षयची पार्श्वभूमी तपासली. दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि हत्येचा उलगडा झाला.