विवेक भुसे
पुणे : वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे एका बाजूला वाहतूकीचा वेग कमी झाला असला तरी शहरातील अपघातांच्या संख्येत मात्र फारशी घट झालेली दिसून येत नाही़. गेल्या ११ महिन्यात २९८ प्राणघातक अपघातात ३१४ जणांचा मृत्यु झाला आहे़. २०१७ मध्ये शहरात झालेल्या प्राणघातक अपघातात ३७३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता़. या अपघातात सर्वाधिक दुचाकीस्वारांचे प्रमाण ४० टक्के असून २०१८ मध्ये फक्त पुणे शहरात १५८ दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला आहे़.त्यातील एखादा अपवाद वगळता कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते़. या दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले असते तर या अपघातातील अनेकांचे प्राण वाचले असते़. त्यामुळे या अपघातात घट व्हावी, यासाठी शहर पोलीस दलाने हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे़.
..............................
विना हेल्मेट दुचाकीस्वारांना २ कोटींचा दंडशहरात आज सरसकट हेल्मेट सक्ती राबविली जात नसली तरी दुचाकी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास व तो विना हेल्मेट असेल तर त्याच्यावर हेल्मेटसक्तीनुसार दंडात्मक कारवाई केली जाते़. या वर्षी आॅक्टोबरअखेर अशा ३८ हजार ५० वाहनचालकांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून आतापर्यंत १ कोटी ९० लाख २५ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे़याशिवाय वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणाऱ्या ४६ हजार ५० जणांवर कारवाई करुन त्यांच्या ९३ लाख १२ हजार रुपये दंड वसुल केला गेला आहे़.