Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 18:19 IST2025-03-14T18:18:55+5:302025-03-14T18:19:21+5:30

पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या

3 accidents in different areas of Pune city Two senior citizens and a youth die | Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या.

पुणे-नगर रस्त्यावर विमाननगर परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ११) रात्री दहाच्या सुमारास घडली. अपघातानंतर पसार झालेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणव प्रवीण औचर (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत नीलेश प्रल्हाद ढसाळ (वय ४५, रा. साई सत्यम पार्क, वाघोली) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार प्रवीण हा मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. विमाननगर परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसने दुचाकीस्वार प्रवीणला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवीणचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या बसचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.

नगर रस्त्यावर लाेणीकंद भागात वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शालीग्राम पाखरे (वय ७०) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वाहनचालक अक्षय भीमराव मोहळ (२२, रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पाखरे यांचे जावई मंगेश पंजाब ठाकरे (३५, रा. लाेणीकंद, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालीग्राम पाखरे हे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास नगर रस्त्यावरून निघाले होते. लोणीकंद परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पाखरे यांना भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाखरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हवालदार साळुंखे तपास करत आहेत.

औंधमधील ब्रेमेन चौकात टेम्पोच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ताराबाई शंकर मोहाडीकर (७५, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत मोहाडीकर यांचा मुलगा जगदीश (वय ५०) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई मोहाडीकर बुधवारी (दि. १२) सकाळी आठच्या सुमारास ब्रेमेन चौकातून निघाल्या हाेत्या. रस्ता ओलांडताना मोहाडीकर यांना भरधाव टेम्पोने धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक येळे तपास करत आहेत.

Web Title: 3 accidents in different areas of Pune city Two senior citizens and a youth die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.