पुणे विमानतळावर सापडली २८ काडतुसे; प्रवाशाला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:52 IST2025-01-06T13:52:30+5:302025-01-06T13:52:40+5:30
याप्रकरणी प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

पुणे विमानतळावर सापडली २८ काडतुसे; प्रवाशाला पोलिसांनी केली अटक
पुणे : लोहगाव येथील विमानतळावरून हैदराबादला निघालेल्या प्रवाशाच्या पिशवीतून २८ काडतुसे जप्त करण्यात आली. विमानतळावरील सुरक्षा विभागाने काडतुसे बाळगणाऱ्या प्रवाशाला पकडून पोेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
दीपक सीताराम काटे (वय ३२, रा. सराटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत इंडिगो एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीती भोसले ३ जानेवारी रोजी पावणेअकराच्या सुमारास प्रवाशांच्या पिशव्यांची तपासणी करत होत्या. काटे हे इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून हैदराबादला जाणार होते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी धातूशोधक यंत्राकडून (मेटल डिटेक्टर) केल्या जाणाऱ्या तपासणीत काटे यांच्या पिशवीत दोन मॅगझीन, तसेच २८ काडतुसे सापडली. याबाबत काटे यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यांनी काडतुसे का बाळगली? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे तपास करत आहेत.