- विवेक भुसेपुणे : रस्ते रुंद झाले, वाहनांची संख्या आणि वेगही वाढला़. त्याबरोबर ठराविक भागात पदपथ प्रशस्त झाले़ तरीही एकूणच शहराच्या वाहतूक व्यवस्थेत पादचारी दुर्लक्षित राहिला असून गेल्या पाच महिन्यात २५ पादचाऱ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे़. पुणे महापालिकेने पादचारी धोरण तयार केले़. तसेच अर्बन स्ट्रिट डिझाईनच्या मार्गदर्शन सूचना तयार केल्या़ असे धोरण तयार करणारी देशातील पहिली महापालिका म्हणून स्वत:चा गौरव करुन घेतला़. पण, या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणीत केली जात नसल्याने अजूनही पादचारी दुर्लक्षित राहिला आहे़.
महापालिका, वाहतूक पोलिसांचे पादचाऱ्यांकडे दुर्लक्ष, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सर्वच स्तरावर असलेली अनास्था, तसेच पादचाऱ्यांकडून वाहनांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील पादचारी असुरक्षित झाले आहेत़. पादचाऱ्यांच्या झालेल्या या अपघातात प्रामुख्याने रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या वाहनांने दिलेली धडक आणि पाठीमागून आलेल्या वाहनांनी पादचाऱ्यांना दिलेली धडक या दोन कारणांमुळे प्रामुख्याने अपघात होत आहे़. गेल्या पाच महिन्यात शहरात झालेल्या ८३ अपघातात एकूण ८६ जणांना आपला जीव गमवावा लागला़. त्यात सर्वाधिक २५ पादचाऱ्यांचा समावेश आहे़ किरकोळ जखमी झालेल्यांची संख्या त्यातून किती तरी अधिक आहे़.
याबाबत पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार यांनी सांगितले की, महापालिकेने पादचारी धोरण तयार केले़. अर्बन स्ट्रिट डिझाईनबाबत गाईडलाईन तयार केल्या़. ज्या गांभीर्याने या समितीने ३ वर्षे झटून हे धोरण तयार केले़. मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष करत महापालिकेनी त्याची अंमलबजावणी केली नाही़. शहराच्या ठराविक रस्त्यांवर प्रशस्त फुटपाथ तयार झाले़. पण, त्याच्यावर अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्यात येत नाही़. फुटपाथ बांधल्यानंतर आपली जबाबदारी संपली असे महापालिकेला वाटते, तर अतिक्रमण हे आपले काम नसल्याचे पोलिसांचा समज आहे़. त्यामुळे दोन्ही यंत्रणा याची जबाबदारी घेत नसल्याने पादचारी पुन्हा वाऱ्यावरच राहिला आहे़.
महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईत सातत्य दिसून येत नाही़. त्यामुळे फुटपाथवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होताना दिसते़ सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीजचे होऊन जाते़. वाहतूक शाखेकडून पादचारी मार्गावर वाहन पार्क केले असेल तर त्यांच्यावर महापालिका कायद्यानुसार १ हजार रुपये दंडाची कारवाई केली जाते़. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी चौकातील वाहतूक पोलीस हे अनेकदा ज्येष्ठांना मदत करीत असतात़. शहरातील वाहनांची संख्याच इतकी वेगाने वाढत आहे की, त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्याकडे वाहतूक पोलिसांना सर्वप्रथम लक्ष द्यावे लागत असल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़