मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू; लग्नाला झाले होते ६ महिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:36 IST2021-11-17T15:36:17+5:302021-11-17T15:36:51+5:30
महिला नव्यानेच लाखनगाव ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम पाहू लागली होती

मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू; लग्नाला झाले होते ६ महिने
मंचर : कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये ओढणी गुंतून गळफास लागल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लाखनगाव (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी सकाळी घडली. सोनाली अजय दौंड (वय २१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा विवाह सहा महिन्यापूर्वी झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनगाव येथील गव्हाळी मळ्यात राहणारी सोनाली अजय दौंड हिचा विवाह सहा महिन्यापूर्वी झाला होता. दौंड कुटुंबियांचा दुग्ध व्यवसाय असून सकाळी सोनाली जनावरांचे खाद्याची कुट्टी करण्यासाठी गोठ्यात गेली होती. त्यावेळी आजूबाजूला कोणी नव्हते. कुटीमध्ये पेंढी घालत असताना पेंढी बरोबर तिचा दुपट्टा आतमध्ये ओढला गेला. दुपट्टाची दोन्ही बाजू आत गेल्याने तिला गळफास बसून या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुभाष दौंड हे शेतात मेथीला तन नाशक मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी नवनाथ लक्ष्मण रोडे व वैभव रामदास पडवळ यांनी घटनेची माहिती त्यांना दिली. सुनील दौंड यांनी सोनाली दौंड याची कडबा कुट्टी मशीन मधून सुटका करून घराच्या बाहेर त्यांना आणले होते. त्या कुठलीही हालचाल करत नव्हत्या. सुरुवातीला पारगाव व नंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात सोनाली हीला उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
सोनाली ही नव्यानेच लाखनगाव ग्रामपंचायतमध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम पाहू लागली होती. सुभाष दौंड यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी नोंद घेतली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत. सुभाष सोपान दौंड यांनी मंचर पोलिसात माहिती दिली आहे.