प्लॉट देण्याच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक; व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर गुन्हा दाखल
By नितीश गोवंडे | Updated: December 17, 2023 18:32 IST2023-12-17T18:32:06+5:302023-12-17T18:32:39+5:30
व्हिजन ग्रुपचे सीएमडी व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल

प्लॉट देण्याच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक; व्हिजन ग्रुपच्या सीएमडी सह दोघांवर गुन्हा दाखल
पुणे : प्लॉट देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन १६ लाख ८७ हजार ५०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी व्हिजन ग्रुपचे सीएमडी व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१९ दरम्यान नऱ्हे येथील नवले आयटी पार्कच्या ऑफिसमध्ये घडला आहे.
याप्रकरणी भारती राजीव शिखरे (४६, रा. वसंत विहार को ऑफ सोसायटी, वैशालीनगर, घाटीपाडा रोड, मुलुंड, मुंबई) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून व्हिजन ग्रुपचे सीएमडी योगेश दत्तात्रय भंडारे आणि व्यंकटेश्वरा डेव्हलपर्सचे दौलतराव उमाजी महाडिक (रा. वाई, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिजन ग्रुप चे सीएमडी योगेश भंडारे व व्यंकटेश्वरा डेव्हलपर्स चे दौलतराव महाडिक यांनी संगनमत करुन सेव्हन हिल्स प्रकल्प विक्रीसाठी दाखवला. फिर्यादी शिखरे यांना प्लॉट क्रमांक ६३आणि ६४ चे अलॉटमेंट लेटर दिले. यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी चेक तसेच एनएफडी द्वारे १६ लाख ८७ हजार ५०० रुपये घेतले. तसेच पैसे घेतल्याप्रकरणी बनावट पावत्या आरोपींनी शिखरे यांना दिल्या. यानंतर शिखरे यांनी भंडारे आणि महाडिक यांच्याकडे अनेकदा खरेदीखत करुन देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी खरेदीखत करुन देण्यास टाळाटाळ करुन शिखरे यांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लाड करत आहेत.