वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; तर बहीण गंभीर जखमी, शिरूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 18:13 IST2022-09-28T18:12:43+5:302022-09-28T18:13:07+5:30
तरुणीच्या विवाहित बहिणीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

वीज पडून १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू; तर बहीण गंभीर जखमी, शिरूर तालुक्यातील घटना
रांजणगाव सांडस : शिरूर तालुक्यातील सादलगाव येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वीज पडून तरुणी मृत्युमुखी पडली आहे. रिता सिताराम नाईक ( वय १६ वर्षे, मूळ राहणार आडशी, या. जि. नंदूरबार) असे या तरुणीचे नाव आहे. तर या तरुणीची विवाहित बहीण गीता राजेश वळवी ही यामध्ये जखमी झाली आहे. गीता वर मांडवगण फराटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना पाऊस सुरू झाला होता. पाऊस पडत असताना या दोघी बहिणी उसाच्या फडातून ट्रॅक्टर कसा येईना हे पाहण्यासाठी रस्त्यावर आल्या होत्या. यावेळी या दोघींवर वीज पडली. यात रीता व गीता या दोघी बहिणी बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी रीताला मृत घोषित केले. तर बेशुद्धावस्थेतील गीता हीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात पाठवले. गीता हीची प्रकृती गंभीर असल्याचे वरद विनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील पवार यांनी सांगितले. मृत रीता हीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.