१६ जणांना शहरातून पाठवणार परत; बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:51 IST2025-07-22T09:51:13+5:302025-07-22T09:51:35+5:30
१५ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महिलांना पुणे विमानतळावरून, तर पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाणार

१६ जणांना शहरातून पाठवणार परत; बांगलादेशी घुसखोरांविरोधात पुणे पोलिसांची कारवाई
पुणे: देशात बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करून, शहरात वास्तव्य करणाऱ्या १६ बांग्लादेशी नागरिकांना आज त्यांच्या देशात पाठवण्यात येणार आहे. पुणेपोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामध्ये १५ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. महिलांना पुणे विमानतळावरून, तर पुरुषाला मुंबई विमानतळावरून पाठवून दिले जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पुणे पोलिसांनी १६ जुलैपासून बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. बुधवार पेठ, शुक्रवार पेठ आणि आंबेगाव येथून १६ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. यातील महिलांना मुंढवा येथील शासकीय महिला सुरक्षागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांना कायदेशीर पद्धतीचा अवलंब करून त्यांच्या देशात पाठवले जाणार आहे. या कारवाईत पुणे पोलिसांची विशेष शाखा, गुन्हे शाखेची दोन पथके, पाच परिमंडळांची पाच पथके आणि स्थानिक पोलिस ठाण्यांची तपास पथके सहभागी झाली होती. ताब्यात घेतलेल्या महिलांपैकी अनेक महिला वेश्या व्यवसायात होत्या आणि त्यांना फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेला पुरुष बांग्लादेशी मजूर म्हणून काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
असे दिले जाणार त्यांना पाठवून..
पोलिसांच्या विशेष शाखेकडून या बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवून देण्याबाबत राज्य शासनाला कळवले जाते. राज्य शासनाकडून केंद्रीय गृहमंत्रालयाला कळवले जाते. गृहमंत्रालयाकडून संबंधित नागरिक बांग्लादेशी असल्याची खात्री केली जाते. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या समन्वयाने विमानाने या बांग्लादेशींना कोलकाता येथे नेण्यात येते. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बांग्लादेशात पाठवले जाते. शहरात अवैधपणे राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना यापूर्वीही त्यांच्या देशात पाठवण्यात आले आहे. २०२० ते २०२४ या पाच वर्षांत केवळ आठ बांग्लादेशी नागरिकांना डिपोर्ट करण्यात आले आहे. २०२५ मध्ये यापूर्वी एका बांग्लादेशी नागरिकाला डिपोर्ट करण्यात आले असून, मंगळवारी १६ बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या देशात धाडले जाणार आहे.
मंगळवारी १६ बांग्लादेशी नागरिकांची पहिली तुकडी डिपोर्ट करण्यात येणार आहे. तसेच २०२५ मध्ये एकूण १५ बांग्लादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ८ पुरुष आणि ७ महिला आहेत. या नागरिकांविरोधात न्यायालयात खटले सुरू आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांनाही भारतातून पाठवले जाईल. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
यापूर्वी कोणत्या वर्षी किती बांग्लादेशींना पाठवले..
२०२० - ०१
२०२१ - ०२
२०२२ - ०२
२०२३ - ००
२०२४ - ०३
२०२५ - ०१