पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यातील नऊ विभागांमध्ये इयत्ता बारावीची अंतिम परीक्षा घेतली जात असून आतापर्यंत या परीक्षेमध्ये ४९ केंद्रांवर १५० गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक घटना छत्रपती संभाजीनगर विभागातील असून नालासोपारा येथे एक डमी विद्यार्थी आढळल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांमध्ये ११ फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. ही परीक्षा ११ मार्चपर्यंत चालणार आहे. नऊ विभागातील ३ हजार ३७३ मुख्य केंद्रे आणि ३ हजार ३७६ उपकेंद्रांवर होत असलेल्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये विज्ञान शाखा - ७ लाख ६८ हजार ९६७, कला शाखा - ३ लाख ८० हजार ४१०, वाणिज्य शाखा - ३ लाख १९ हजार ४३९, किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम - ३१ हजार ७३५ आणि टेक्निकल सायन्स - ४ हजार ४८६ अशा विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आतापर्यंत बारावीच्या परीक्षेमध्ये राज्यातील ४९ परीक्षा केंद्रांवर एकूण १५० गैरप्रकाराच्या घटना ओळखून आल्या आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील १७ केंद्रांवर सर्वाधिक १०४ गैरप्रकार घडले आहेत. आजवर आढळलेल्या १५० गैरप्रकारांमध्ये भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेत ७४ गैरप्रकार घडले आहेत. तर पुणे विभागात ६ केंद्रांवर १८ गैरप्रकार समोर आले आहेत. याशिवाय नालासोपारा येथे एक डमी विद्यार्थी आढळून आल्याचे गोसावी यांनी सांगितले.