चालकाच्या प्रसंगावधानाने १५ विद्यार्थी थोडक्यात बचावले; खराडीत स्कुल बस जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 19:00 IST2024-12-05T18:59:56+5:302024-12-05T19:00:30+5:30
बसच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे चालकाने तातडीने बस थांबवून मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली

चालकाच्या प्रसंगावधानाने १५ विद्यार्थी थोडक्यात बचावले; खराडीत स्कुल बस जळून खाक
चंदननगर : खराडीत शाळेतील विद्यार्थांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने अचानक पेट घेतला.चालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवून नागरिकांच्या मदतीने तात्काळ १५ विद्यार्थ्यांना खाली उतरविले.त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.काही क्षणातच बस आगीत जळून खाक झाली.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन गाड्यांच्या आग आटोक्यात आणली.गुरुवारी दुपारी ही आगीची घटना घडली.
खराडी परिसरात फिनिक्स वर्ल्ड स्कूल नावाची नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. नेहमी प्रमाणे दुपारी शाळा सुटल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी आपापल्या बस मध्ये जाऊन बसले. २४ सिटर बसमध्ये जाणारे विद्यार्थी त्या बस मध्ये चढले. काही विद्यार्थ्यांना सोडून बस तुळजभवानीनगर मध्ये आली असताना अचानक बसच्या इंजिन मधून धूर बाहेर येत असल्याचे चालक माधव राठोड यांना दिसले.
त्यामुळे चालकाने बस थांबवली तितक्यात अचानक इंजिन मध्ये आग लागली. त्यामुळे चालकाने तातडीने बस मधील १५ मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. आग वाढल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक नागरिकांनी धाव घेत मुलांना बस मधून बाहेर काढण्यासाठी मदत केली. यावेळी बस मध्ये वीस विद्यार्थी होते.बस मधील सर्व विद्यार्थी खाली उतरल्यावर काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आणि जळून खाक झाली.