देशातील १५ टक्के खासदार संसद चालवतात; इतर खासदार केवळ बसून असतात - इम्तियाज जलील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 16:29 IST2025-10-09T16:29:17+5:302025-10-09T16:29:52+5:30
देशात राजकारणाचा स्तर घसरल्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे.

देशातील १५ टक्के खासदार संसद चालवतात; इतर खासदार केवळ बसून असतात - इम्तियाज जलील
पुणे : देशात निवडून येणाऱ्या खासदारांपैकी सुशिक्षित, अभ्यासू खासदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील समस्या काय आहेत, हे त्यांना देखील माहित नसते. संसद भवनात केवळ १५ टक्के खासदार मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी प्रश्न मांडत असून, इतर खासदार केवळ बसून असतात, असे मत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (दि.९) मांडले.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्यावतीने गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ''महात्मा गांधी आणि राष्ट्रीय एकात्मता'' या विषयावर जलील यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन उपस्थित होते. इम्तियाज जलील म्हणाले, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे प्रवास एकदा करून दाखवावा, त्यांना मी २० हजार रुपये बक्षीस देतो. मला या रस्त्यावरून येण्यास आज आठ तास वेळ लागला. विकासाच्या नावावर गप्पा मारणारे साधा रस्ता देखील विकसित करू शकत नाहीत, हे दिसून येते. माझ्यावर अनेक केसेस दाखल केल्या असून, मला हर्सूल कारागृहात पाठविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी जी शिकवण दिली त्यानुसार आपण वाटचाल करतो आहे का? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. देशात राजकारण स्तर ज्याप्रकारे घसरत आहे, त्याने परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आहे. सत्ताधारी यांच्याकडून खुर्ची टिकवण्यासाठी जाती धर्मात भांडणे लावली जात आहे.
आयुष्यात सत्यासाठी लढणे महत्त्वाचे
हाताला काम मागितले तर दगड देण्यात येतो, एकता मागितले तर जातीधर्मात तेढ निर्माण केली जात आहे. शहरातील जातीचे विष आज ग्रामीण भागात पोहचले आहे. धर्म हा धंदा सध्या जोरात सुरू आहे. सुशिक्षित लोकांच्या सोशल मीडियावर पोस्ट वाचून ते कसे शिकार होतात हे पाहणे दुखदायक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रामनवमी पूर्वीची दंगल ही राज्य पुरस्कृत होती आणि पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या, असेही इम्तियाज जलील यांनी मत व्यक्त केले.