कीर्तनकारांसाठी १४ कलमी प्रतिज्ञापत्र; वादग्रस्त वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी आचारसंहिता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:47 IST2025-11-21T15:47:02+5:302025-11-21T15:47:53+5:30
अलीकडच्या काळात कीर्तनातून होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात किंवा अनावश्यक वाद निर्माण होतात

कीर्तनकारांसाठी १४ कलमी प्रतिज्ञापत्र; वादग्रस्त वक्तव्यांना लगाम घालण्यासाठी आचारसंहिता
आळंदी: सध्या कीर्तनकार आणि प्रवचनकारांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला नवी दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. श्रीक्षेत्र आळंदी - देवाची येथील स्वानंद सुखनिवासी सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी १४ कलमी आचारसंहितेचे प्रतिज्ञापत्र जारी केले आहे. या प्रतिज्ञापत्राद्वारे वारकरी विद्यार्थ्यांनी संत साहित्याच्या अभ्यासापासून ते वैयक्तिक आचरण आणि सामाजिक बांधिलकीपर्यंत अनेक नियमांचे 'काटेकोर पालन' करण्याची शपथ घेतली आहे. भविष्यात तयार होणारे कीर्तनकार आणि प्रवचनकार हे अधिक जबाबदार आणि धर्मनिष्ठ असावेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
अलीकडील काळात काही कीर्तनकारांची वादग्रस्त विधाने आणि भौतिक प्रलोभनांमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत, जोग महाराज संस्थेसारख्या १०० वर्षांहून अधिक जुन्या आणि प्रतिष्ठित संस्थेकडून ही आचारसंहिता लागू करणे, हे वारकरी संप्रदायाच्या मूळ तत्त्वज्ञानाचे पुनरुत्थान करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रतिज्ञापत्रातून केवळ विद्यार्थ्यांचे वैयक्तिक जीवन सुधारणे अपेक्षित नसून, त्यांना भविष्यात एक सुसंस्कृत कीर्तनकार म्हणून समाजाला योग्य दिशा देण्यासही मदत होणार आहे.
काय आहे या आचारसंहितेत...
- ज्ञानेश्वरी, गाथा, संत वाङ्मय यांचा सखोल अभ्यास करून नंतरच इतरांना सांगणे.
- शुद्ध आचरण ठेवून नित्यनेमाने पंढरपूर, आळंदी व देहूची वारी करणे.
- कीर्तनाला धंदा (व्यवसाय) करणार नाही.
- कीर्तनाचा उपयोग मोठेपणा किंवा अपमानासाठी करणार नाही.
- विद्यार्थी म्हणून जन्मभर साधक राहीन, बुवाबाजी करणार नाही.
- संकृती, धर्म, देश, पोषाख याबद्दल अभिमान राखेल.
मोठ्या व श्रीमंत लोकांच्या मागे आशाळभूतपणे लागणार नाही.
- सत्कर्माचे आचरण करून जेवढा परोपकार करता येईल तेवढे जीवन घालवीन.
- परद्रव्य व परकांता यासंबंधी वासना ठेवणार नाही.
आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या परमार्थाच्या नावाखाली टाळण्याचा प्रयत्न करणार नाही. त्या ईश्वराची सेवा समजून आनंदाने पार पाडेन.
- आपले कुटुंब घरापुरतेच न ठेवता मोठे करीन. बहुजन समाजामध्ये मिळून मिसळून वागून त्यांना मदत करेल.
- वारकरी ' सांप्रदायाशी एकनिष्ठ राहून 'हे विश्वची माझे घर' या न्यायाने आणि 'विष्णुमय जंग वैष्णवांचा धर्म' या उक्तीप्रमाणे संस्कार शिबिर, कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सुसंघटीत समाज घडवून विश्वशांतीसाठी प्रयत्न करेल.
- तन, मन, धनाने संस्थेला पुढील काळात सहकार्य करेल.
आचारसंहिता लागू करण्याची गरज का?
वादग्रस्त वक्तव्ये : अलीकडच्या काळात काही कीर्तनकार आपल्या कीर्तनात सामाजिक किंवा राजकीय विषयांवर वादग्रस्त विधाने करतात, ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात किंवा अनावश्यक वाद निर्माण होतात.
व्यावसायिक स्वरूप : काही कीर्तनकारांनी कीर्तन कलेला 'धंद्याचे' स्वरूप दिले आहे, ज्यामुळे परमार्थाऐवजी भौतिक नफ्याला अधिक महत्त्व दिले जात आहे.
सामाजिक आचारणाची अपेक्षा : वारकरी संप्रदायातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींचे सामाजिक आचरण स्वच्छ आणि पारदर्शक असावे, त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात संतांच्या विचारांची शुद्धता असावी, अशी अपेक्षा असते.