मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:16 IST2025-09-16T12:16:27+5:302025-09-16T12:16:39+5:30

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणाऱ्या अनेक विमानांना अर्धा तासापासून ते तीन तासांपर्यंत उशीरही झाला, त्याचा फटका प्रवाशांना बसला.

14 flights arriving in Pune diverted due to heavy rains; passengers face inconvenience | मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणारी १४ विमाने वळविली; प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला

पुणे: रविवारी रात्री शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पुणेविमानतळावरून ये-जा करणाऱ्या विमानांना फटका बसला. परिणामी रात्री बारा ते सकाळी आठ या वेळेत विमानसेवा विस्कळीत झाली. शिवाय धावपट्टीवर पाणी साचले होते. तसेच कमी दृश्यमानता असल्यामुळे पुण्यात येणारी १४ विमाने बंगळुरू, हैदराबाद, सुरत, अहमदाबाद, मुंबईकडे वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

रविवारी रात्री विमानतळ परिसरात पावसाचा जोर मोठा होता. त्यामुळे लोहगाव परिसरात सगळीकडे पाणी साचले होते. तसेच पुणे विमानतळ परिसरात धावपट्टीवर पाणी आले. शिवाय पावसामुळे विमानतळ परिसरात कमी दृश्यमानता निर्माण झाली होती. त्यामुळे विमानांच्या उड्डाणांना अडचण निर्माण झाली होती. तसेच, काही विमानांना पुण्यात उतरता आले नाही. त्यामुळे बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई, नागपूर अशा विविध शहरांमधून पुण्यात येणारी विमाने वेगवेगळ्या शहरांकडे वळवावी लागली. तसेच, सकाळी आठनंतर विमानसेवा रुळावर येण्यास सुरुवात झाली. भारतीय वायुदलाकडून दररोज सकाळी नऊ ते साडेअकरा दरम्यान सराव केला जातो. पण, रात्रभर पावसामुळे झालेल्या परिणामुळे सैनिकी ब्लॉक रद्द करत विमानांच्या उड्डाणाला परवानगी देण्यात आली. त्यामुळे विमानसेवा पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

पावसामुळे अनेक विमाने लेट 

मुसळधार पावसामुळे पुण्यात येणाऱ्या अनेक विमानांना अर्धा तासापासून ते तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागले. दुपारी चेन्नईसाठीचे स्पाइस जेटचे विमान रद्द करण्यात आले. दुबईला जाणाऱ्या विमानाला रात्री दोन तास उशीर झाला. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळ प्रशासन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, विमान कंपन्या व इतर सर्व संबंधितांनी विभागांनी प्रवाशांना मदत करण्यासाठी अतिरिक्त बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, चहा, कॉफी व खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली.

सकाळी पुन्हा पुण्यात 

रविवारी रात्री पावसामुळे वळविण्यात आलेली विमाने सोमवारी सकाळी पुन्हा पुणे विमानतळावर उतरविण्यात आली. यामुळे प्रवाशांना रात्रभर गैरसोयीचा सामना करावा लागला. साेमवारी सकाळीदेखील पुण्यातून उड्डाण करणाऱ्या पाच विमानांना उशीर झाला. शिवाय सोमवारी दिल्लीला जाणारी पाच विमाने रद्द करण्यात आली तर सहा ते आठ विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. सलग दोन दिवस पावसामुळे विमान प्रवाशांना फटका बसत आहे.

Web Title: 14 flights arriving in Pune diverted due to heavy rains; passengers face inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.