संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:04 IST2025-02-20T10:04:16+5:302025-02-20T10:04:25+5:30

रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले असून, बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत

1200 literary figures leave for Delhi for conference; Uday Samanta gives green signal for special train | संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

संमेलनासाठी १२०० साहित्यिक दिल्लीला रवाना; उदय सामंतांनी विशेष रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि माय मराठीचा गजर करत, झेंडूच्या फुलांनी सजलेल्या रेल्वेगाडीतून पुण्यातील साहित्यिक दिल्लीकडे रवाना झाले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून प्रवाशांच्या ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल...श्री ज्ञानदेव...तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय!’ अशा ललकारीने रेल्वे दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील साहित्यिकांसाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वे गाडी बुधवारी (दि. १९) सोडण्यात आली. पुण्यातून दिल्लीला जाणाऱ्या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले असून, बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे दिली आहेत. विशेष रेल्वेचे पुणे स्थानकात आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला.

प्रत्येक बोगीला लावलेली तोरणे लक्ष वेधून घेत होती. या गाडीला उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी डाॅ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ कवयित्री संगीता बर्वे यांसह अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, सभासद, रेल्वेचे अधिकारी आणि साहित्यिक उपस्थित होते. उदय सामंत यांनी अहिल्यानगरपर्यंत प्रवास करत साहित्यिकांशी संवाद साधला. प्रवासामध्ये वारकऱ्यांसह साहित्यिक, प्रवासी आणि तरुणांनी भजन, ओव्या, कविता यांसह हरिपाठ म्हणत साहित्ययात्रेत अभिजात मराठीचा जयघोष केला.

आळंदी-पंढरपूर यात्रा तर दरवर्षी होतेच, आता दिल्ली दरबारात होणारी अभिजात यात्रा वारकऱ्यांसाठी आनंदी यात्रा आहे. संत तुकारामांचे अभंग, माउलींच्या ओव्या, संत जनाबाईंच्या जात्यावरील ओव्या, संत मीराबाई आणि मुक्ताबाई यांची भजने हे साहित्य संमेलनात होणार आहे. - ह.भ.प. दत्तात्रय महाराज शिंदे - कीर्तनकार

साहित्य संमेलन म्हणजे विचारांची शिदोरी गोळा करण्यासारखे आहे. नवनवीन पुस्तके, संवाद, साहित्यिकांची ओळख आणि अनुभव ही खरी पर्वणी आहे. साहित्य संमेलन कुठेही असो, आम्ही दरवर्षी संमेलनात सहभागी होतो. - सुरेश भगत - साहित्यप्रेमी

Web Title: 1200 literary figures leave for Delhi for conference; Uday Samanta gives green signal for special train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.