ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला...! पुण्यात दहीहंडी फुटली १२० कोटींची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 10:43 AM2023-09-08T10:43:18+5:302023-09-08T10:43:37+5:30

तब्बल १ हजार ३०० लहान-मोठ्या मंडळांनी मिळून ही उधळण केली असून अर्धी रक्कम तर सेलिब्रिटींच्या मानधनावरच खर्ची केल्याचा अंदाज

120 Crore Dahi Handi broke out in Pune city | ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला...! पुण्यात दहीहंडी फुटली १२० कोटींची

ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला...! पुण्यात दहीहंडी फुटली १२० कोटींची

googlenewsNext

पुणे: ढाकू माकूम, टाकू माकूम... गाेविंदा रे गाेपाला... यासह विविध गाण्यांच्या आवाजात गोविंदा पथकांनी गुरुवारी पुणे शहर, पिंपरी - चिंचवड आणि जिल्ह्यात तब्बल १२० कोटींची दहीहंडी फाेडली. तब्बल १ हजार ३०० लहान-मोठ्या मंडळांनी मिळून ही उधळण केली. यातील अर्धी रक्कम तर सेलिब्रिटींच्या मानधनावरच खर्ची झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या गाेविंदा पथकांनी संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत सारे परिसर गाजवून सोडले.

पुणे शहर, पिंपरी - चिंचवड, उपनगरे आणि ११ तालुक्यातील अधिकृत - अनधिकृत १,३०० लहान - मोठ्या मंडळांनी हा खर्च केला. डीजे, स्टेज, हंडीची क्रेन, सजावट असा खर्च वजा जाता मानवी मनोऱ्याचे थरावर थर लावून धाडसाने हंडीला हात घालणाऱ्या गोविंदांच्या पथकांना मात्र काही हजारांवर समाधान मानावे लागले.

सगळीकडे कल्लाच कल्ला 

जिल्ह्यातील १,३७० मंडळांमध्ये राजकारण्यांचा आश्रय असलेली, भाविकांचे अनेक वर्षांचे श्रद्धास्थान असलेली, परंपरा म्हणून सगळेच सण, उत्सव साजरे करणारी, धनिकांचा वरदहस्त असलेली अशी अनेक मंडळे आहेत. त्यांची दहीहंडी जोरात होती. त्यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी सायंकाळी ५:०० नंतर सुरू झालेला डीजेंचा दणदणाट रात्री उशिरापर्यंत सुरू होता. लायटिंग, लेझर शो यांनी चौकांमधील सर्व रस्ते उजळून निघाले. उपनगरे व तालुक्यांमधील मुख्य ठिकाणच्या गावातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. गोविदांच्या गाण्यांवर नृत्य करणारे युवक ठिकठिकाणी दिसत होते. बहुसंख्य ठिकाणी सेलिब्रिटींची धूम होती.

...अशी सजली होती दहीहंडी !

एका मोठ्या मंडळाचा दहीहंडीचा खर्च थेट १० लाख रुपयांच्या पुढे आहे. त्यापेक्षाही जास्त खर्च काही मंडळांनी केला असल्याची चर्चा आहे. खर्च करण्याबरोबरच तो दिसावा, यासाठी मंडळांची धडपड होती. त्यामुळेच क्रेनवर अडकवलेल्या दहीहंडीभोवतीही महागडी पुष्पसजावट केलेली होती. फुलांची गोल चक्र, गोलाला फुलांच्याच झिरमिळ्या, हंडीच्या बाजूंनी पुन्हा फुलांचेच दोर, रंगवलेली हंडी, तिला अडकवलेले पुष्पहार अशा हंडीच्या सजावटीचाच खर्च काही हजारांवर असल्याचे खालून पाहिले तरी दिसत होते. लहान मंडळेही यात मागे नव्हती. ‘आपल्या चौकात आपलीच हवा’ अशा हेतूने काही ना काही करून दहीहंडी गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत होता.

जिल्ह्यातील एकूण मंडळांची संख्या

पुणे शहर - ९७२
जिल्ह्यातील ११ तालुके - २४८
पिंपरी - चिंचवड - १५०

ही संख्या पोलिसांकडे अधिकृत नोंद केलेल्या मंडळांची आहे. याशिवाय नोंद नसलेली काही मंडळेही दहीहंडी साजरी करत असतात. पुण्यातील काही उपनगरांत पुणे शहरातील दहीहंडी पाहता यावी म्हणून एक दिवस आधीच दहीहंडी साजरी करण्यात येते. धायरी, वडगाव वगैरे उपनगरांमध्ये मात्र दहीहंडीच्या दिवशीच दहीहंडी होते.

एका मोठ्या मंडळाचा साधारण खर्च

सेलिब्रिटी - एका अभिनेत्रीसाठी ३ लाख ते ५ लाख. दोन किंवा तीन असतील तर त्या पटीत.
क्रेन - एका तासासाठी २५ हजार ते ५० हजार, किमान ४ ते ५ तास क्रेन लागते.
स्पिकर्स - ५० हजारांपासून पुढे १ ते दीड लाख रुपयांपर्यंत.
लेझर शो - मोठे बिमर्स - शार्पी लाइट - ५० हजार रुपयांपासून पुढे १ लाख रुपयांपर्यंत.
स्वतंत्र स्टेज, लोखंडी कमानींसह - २५ हजार रुपयांपासून ५० हजार रुपयांपर्यंत.
अनाउन्सर - निवेदक - ५ हजार रुपयांपासून पुढे जसे त्याचे नाव असेल त्याप्रमाणे २५ हजारांपर्यंत.
दहीहंडीची सजावट - फ्लेक्स, जाहिराती - १ ते २ लाख रुपये.

तारे तारकांना येतो भाव

गर्दी खेचण्यासाठी अभिनेता-अभिनेत्रींना मंडळांकडून विशेष मागणी असते. यंदाही ---, ---, ---, प्राजक्ता माळी, जुई गडकरी, तन्वी मुंडाळे, श्वेतांबरी कुंटे या दहीहंडीचे आकर्षण ठरल्या. गौतमी पाटीलची क्रेझ असल्याने तिला हेलिकॉप्टरने आणायची तयारीही मंडळांनी दर्शविली होती. वाघोलीमधील एका मंडळाने तिच्या ‘हटके’ अदांसाठी ६ लाख रुपये दिले असल्याची जोरदार चर्चा आहे.

राजकीय पदाधिकारी निरुत्साही 

एरवी दहीहंडीसह विविध सार्वजनिक सणांमध्ये नेहमी आघाडीवर असणाऱ्या स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी पडद्याआड राहणेच पसंत केल्याचे दिसून आले. महापालिकेच्या नगरसेवकांचे पद संपुष्टात येऊन आता सव्वा वर्ष उलटून गेले. नव्याने निवडणूक कधी होणार ते अद्याप निश्चित नाही, त्यामुळेच यंदा स्थानिक इच्छुकही फारसे दिसले नाहीत. पेठांमधील हे चित्र हाेते. गुरुजी तालीम मंडळाला आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी यांनी भेट दिली. ते वगळता अन्य मंडळांच्या दहीहंडीमध्ये स्थानिक राजकीय व्यक्ती फारशा समोर आल्या नाहीत. उपनगरांमध्ये मात्र काही प्रमाणात स्थानिक इच्छुक मंडळींचा पुढाकार दिसून आला.

इव्हेंट कंपन्यांना जबाबदारी 

तुम्ही सांगा काय करायचे, त्यापेक्षाही भारी करू असा शब्द देणाऱ्या इव्हेंट कंपन्यांकडेच काही मंडळांनी दहीहंडीची जबाबदारी सोपवली होती. कार्यकर्त्यांना मोकळीक देण्यासाठी म्हणून राजकारण्यांकडून असा खर्च केला जातो. कंपन्यांकडे कारागिरांपासून ते कलाकारांपर्यंत टीम तयार असते. १ लाखांपासून पुढे पैसे घेऊन इव्हेंट कंपनी या सगळ्या गोष्टी ॲरेंज करून देते. काम मिळाले की, सेलिब्रिटीपासून ते साऊंड सिस्टमपर्यंत अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. पुण्यातील काही मंडळे मागील वर्षीपासून इव्हेंट कंपनीला काम देत आहेत. यंदाही काही मंडळाच्या उत्सवाचे सर्व संयोजन अशा कंपनीकडूनच केले जात असल्याचे दिसून आले.

''मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उत्सवाचे आयोजन, तो प्रसिद्ध कसा करायचा याचे नवे फंडे माहिती नसतात. तसेच सेलिब्रिटींचे संपर्क नसल्याने त्यातही त्याची अडचण होते. आम्ही ही कामे करून देतो. हा नव्या जगातील व्यवसाय असून, त्यात काही गैर नाही. - नितीन साळुंखे, इव्हेंट मॅनेजर''

मंडळांनी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांसाठी जाहीर केलेली बक्षिसे

गुरुजी तालीम मंडळ - १,२१,०००
बाबू गेनू मंडळ - २१, ०००
अखिल मंडई मंडळ - ११,०००
खजिना विहीर मंडळ - २१,०००
टिळक रोड मित्र मंडळ - ५१,०००

Web Title: 120 Crore Dahi Handi broke out in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.