पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:03 IST2025-04-16T12:02:32+5:302025-04-16T12:03:42+5:30

सर्रास रुग्णालये रोखीने बिले घेतात, सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत, साहजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात

12 hospitals in Pune are charitable They violated the rules robbed the poor for treatment | पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले

पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले

अंबादास गवंडी 

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी किती रुग्णांना सेवा दिली, याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार लोकमतने धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनच याबाबची आकडेवारी मिळवली आहे. गेल्या वर्षभरात शहरातील ५८ पैकी बारा रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नाही की, नियमानुसार त्यांच्यावर अल्पदरात किंवा मोफत उपचार केले नाहीत.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२४ एका वर्षात पुणे जिल्ह्यातील ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त उपचार सिंहगड डेंटल महाविद्यालय ॲंड हाॅस्पिटलमध्ये करण्यात आले आहेत, तर दीनदयाल मेमोरियल हाॅस्पिटल, एन. ए. वाडिया हाॅस्पिटलसह इतर बारा रुग्णालयांनी एकाही रुग्णावर मोफत उपचार केले नाही. धर्मादाय श्रेणीखाली शहरासह जिल्ह्यात ५८ रुग्णालयांची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब आणि निर्धन रुग्णांवर मोफत उपचारांसाठी १० टक्के बेड राखीव ठेवण्याचा नियम आहे; पण सर्रास रुग्णालयांत याची माहिती दिली जात नाही. यामुळे गरीब व गरजू रुग्ण योजनेपासून वंचित राहतात. रुग्णालयातील एकूण खाटांपैकी १० टक्के खाटा गरीब व निर्धनांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. या योजनेतील रुग्णांना उपचार, जेवण, कपडे, बेड व डॉक्टरची सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात द्याव्या लागतात. अशा रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यासही मनाई आहे. या योजनेवर नियंत्रणासाठी जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्तांसह जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आदींची समिती काम करते.

धर्मादायचा नियम काय?

धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर ‘धर्मादाय’ असा ठळक उल्लेख अपेक्षित आहे. गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. या योजनेची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

केवळ ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार

वर्षभरात रुग्णालयात रुग्णांकडून जमा होणाऱ्या एकूण बिलांपैकी दोन टक्के रक्कम धर्मादाय योजनेतून उपचारासाठी राखून ठेवावी लागते. सर्रास रुग्णालये रोखीने बिले घेतात. सर्वच बिले कागदोपत्री दाखवली जात नाहीत. साहजिकच धर्मादायमधून उपचारही कमी होतात. पुणे शहरासह जिल्ह्यात हजारो कोटींचा उलाढाल होणाऱ्या रुग्णालयात वर्षभरात केवळ ८६ हजार ८२६ रुग्णांना उपचार करण्यात आले.

९५ कोटींंचा उपचार 

गेल्या वर्षांत पुणे आणि जिल्ह्यातील ५८ धर्मादाय रुग्णालयांनी ८१ कोटी ८२ लाख ८२ हजार १६३ रुपये निधी उपचारासाठी शिल्लक होते. पण, प्रत्यक्षात ९५ कोटी २८ लाख ७९ हजार ६९३ रुपये प्रत्यक्ष खर्च केले. त्यामुळे १३ कोटी ४५ लाख ९७ हजार ५२९ रुपये वाढीव खर्च झाला आहे.

Web Title: 12 hospitals in Pune are charitable They violated the rules robbed the poor for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.