१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
By किरण शिंदे | Updated: May 24, 2025 10:58 IST2025-05-24T10:57:34+5:302025-05-24T10:58:23+5:30
या कारवाईसाठी 150 ते 200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता

१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री कारवाई करत छापा टाकला आहे. प्राईड आयकॉन नावाच्या इमारतीत सुरू असलेल्या या कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी 150 ते 200 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मॅग्नेटल बीपीएस अँड कन्सल्टन्सी एलएलपी या नावाच्या बनावट कॉल सेंटरवर करण्यात आली आहे. या कॉल सेंटरवरून रॅकेट अमेरिकेतील नागरिकांना फोन करून 'डिजिटल अटक' करण्याची भीती दाखवत त्यांच्याकडून पैसे उकळत होते. अशी देखील माहिती आता समोर येत आहे. या बनावट कॉल सेंटर मधून अनेकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे.
मध्यरात्री झालेल्या पोलिसांच्या छापेमारीत काय काय घडलं?
प्राईड आयकॉन इमारतीमध्ये हे कॉल सेंटर सुरु होते. या कॉल सेंटरमध्ये 100 ते 150 लोक काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. या कॉल सेंटर मधील बहुतांश कर्मचारी गुजरातमधील आहेत. सायबर पोलिसांनी 61 लॅपटॉप, 41 मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचा डेटा जप्त केला आहे. सध्या 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आणखी काहींची चौकशी सुरू आहे. अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करून डिजिटल अटक व मोबदल्यात पैसे उकळण्याचा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या छाप्यात सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.